लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज

 पालकसचिवांनी घेतला जिल्हयातील विविध प्रलंबित प्रश्न आणि कोरोना परिस्थितीचा आढावा


 

            अहमदनगर, दि. ०५: जिल्ह्याचे पालकसचिव आशिषकुमार सिंह यांनी आज जिल्ह्याच्या राज्य स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध विषय तसेच जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती आणि लसीकरण आदी विषयांचा व्ही़डिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना तपशीलवार माहिती दिली तसेच जिल्ह्याच्या विविध विषयांसंदर्भात आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

            पालकसचिव श्री. सिंह यांना जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान, नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उर्वरित बांधकामासाठी लागणारा निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, भूसंपादन, पर्यटन, इमारत बांधकाम, प्रस्तावित पोलीस स्टेशनची मान्यता, घरकुल योजना आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी माहिती दिली.

            जिल्ह्यासाठीच्या विविध योजनांसंदर्भात आपण तातडीने पाठपुरावा करु. त्याअनुषंगाने परिपूर्ण माहिती संबंधित विभागाकडून घेऊन सादर करण्याच्या सूचना श्री. सिंह यांनी दिल्या.

            दरम्यान, ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            कोरोना लसीकरणासंदर्भातील माहितीही त्यांनी घेतली. जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांची माहिती संकलित केली असून पहिल्या टप्प्यात त्यांना लस दिली जाणार आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत ६० वर्षे वयोगटातील नागरिक आणि को-मॉर्बिड नागरिकांची माहितीही आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

            दरम्यान, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी पहिल्या टप्प्याचे ७३ कोटी अनुदान प्राप्त असून उर्वरित अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. नुतन जिल्हाधिकारी इमारतीचे बांधकाम पूर्णत्वासाठी अजून १२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पर्यटनाच्या विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास ८० कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी संबंधित राज्यस्तरीय विभागांकडे पाठपुरावा सुरु असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post