माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल पुणे : शैक्षणिक संस्थाचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे संस्था संचालकाचे अपहरण करुन, चाकुचा धाक दाखवित धमकाविणे तसेच पाच लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भाजप नेते गिरिश महाजन यांच्यासह जळगावमधील 31 जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी गिरीश दत्तात्रय महाजन (रा. जामनेर, जळगाव),  तानाजी भोईटे (रा. कोंढवा), निलेश भोईटे, विरेंद्र भोईटे (रा.भोइटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील हे  जळगावमधील विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दाखविले. मात्र पाटील यांनी त्यास नकार दिला. 

दरम्यान, संशयित आरोपीनी पाटील यांना संस्थासंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करुन पुण्यात बोलाविण्यात आले. त्यानंतर त्यांना शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. तसेच फिर्यादी व त्यांच्यासमवेतच्या एका व्यक्तीला एका गाडीत जबरदस्तीने बसवुन सदाशिव पेठेत एका सदनिकेत नेऊन हात-पाय बांधून डांबले. तसेच त्यांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखविला. फिर्यादीने सर्व संचालकांचे राजीनामे न आणल्यास त्यांना एमपीडीएच्या गुन्हेत अडकविण्याची धमकी देत 5 लाखाची खंडणी घेतली. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post