प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा, राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखावा

 प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून आढावाअहमदनगर, दि. 13 - प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पोलीस परेड मैदान येथे होणार असून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सकाळी ९-१५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक उपस्थितीत आणि सर्व संकेतांचे पालन करीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी बैठक घेऊन विविध विभागांना त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीची माहिती दिली.

या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित. उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उर्मिला पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊन दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या. निमंत्रित उपस्थितांसाठी सोशल डिस्टंस्टिंग राखत बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

राष्ट्रीय कार्यक्रम व इतर महत्वाच्या प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिकरित्या वापर केला जातो. मात्र, असे करताना राष्ट्रध्वजाची अवहेलना आणि अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याशिवाय, प्लास्टीकचे राष्ट्रध्वज विकण्यास आणि त्याच्या वापरावरही प्रतिबंध असून नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post