काही क्षणात होत्याचे नव्हते....घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, संसारोपयोगी साहित्य भस्मसात

 काही क्षणात होत्याचे नव्हते....घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, संसारोपयोगी साहित्य भस्मसातराहुरी (राजेंद्र उंडे) : राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या श्रीदत्त वसाहतीमध्ये एका घरात शनिवारी पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. परंतु, पसरलेल्या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपयाच्या वस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली. काही क्षणात होत्याच नव्हते झाल्यानं या कुटुंबावर आपत्तीचा मोठा डोंगर कोसळला आहे.

         अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही भीषण घटना घडली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. घरासमोरील श्री दत्त मंदिरात दैनंदिन पूजेसाठी पहाटे सव्वाचार वाजता पाटील घराबाहेर पडले. त्यांच्या पत्नी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. घरात दोन मुलगे, एक भाचा, एक भाची झोपलेले होते.  एका खोलीत सिलबंद भरलेले गॅस सिलेंडर ठेवले होते. तिथे अचानक लिकेज होवून आग लागली. घरातील सर्वजण तत्काळ बाहेर धावले. त्यांना गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला. पाटील यांनी स्फोटाचा आवाज ऐकून, घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चारही खोल्यांमध्ये आग पसरली. घरातील अंथरून- पांघरून, कपडे, स्टीलची दोन कपाटे, एक फ्रीज, अन्नधान्य, किराणा सामान, घरगुती वापरण्याच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केले. सिलेंडरचा स्फोटाने घराचे दरवाजे, खिडक्या, तावदाने फुटली. सहा महिन्यापूर्वी नवीन घेतलेली एक दुचाकी आगीत भस्मसात झाली. महावितरण कंपनीने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post