भरतीवेळी गुन्ह्याची माहिती लपवली, पुरवठा निरीक्षक शासकीय सेवेतून बडतर्फ
नगर: शेवगावचे पुरवठा निरीक्षक पवनकुमार बिघोत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश नाशिक येथील विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संकेत काळकुंभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. बिघोत यांनी शासकीय भरतीवेळी गुन्ह्याची माहिती दडवली, असा त्यांच्यावर आरोप होता.
भरती प्रक्रियेतील जाहिरातीमधील ३२ व्या कलमानुसार पोलीस तपासणीची कार्यवाही आक्षेपार्ह असल्यास व नियुक्ती दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. ही बाब त्यांनी शासनापासून लपवून ठेवली असल्याचे स्पष्ट झाल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. बिघोत यांना १८ फेब्रुवारी २०१९ रोजी तात्पुरती पदस्थापना देण्यात आली होती. याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून अहवाल मागविण्यात आला होता. समितीच्या २२ डिसेंबर २०२० च्या अहवालानुसार बिघोत यांच्यावरील गुन्हा जरी न्यायप्रविष्ट असला तरी शासन सेवेत दाखल होण्याच्या अगोदरचा आहे, तसेच तो गुन्हा त्यांनी लपविल्याने ते कारवाईस पात्र असल्याचे सर्व समितीच्या सदस्यांनी मत मांडले आहे, असे आदेशात म्हटले आहे, तसेच बिघोत यांनी भरतीच्या अटी व शर्तींचा भंग केला. त्यांची कृती अशोभनीय, सचोटी, कर्तव्य यांचा भंग करणारी असल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे.
Post a Comment