राष्ट्रवादी सोडल्यावर त्यांची अशी अवस्था झाली.... उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिचड पितापुत्रांना अप्रत्यक्ष टोला
नगर: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती, विकासकामे यांचा आढावा घेतला तसेच राजकीय टोलेबाजीही केली. त्यांचा जास्त रोख नगर जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून गेलेल्यांवर होता.
नगर आणि पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. पुण्याचे दहा तर नगरने सात आमदार दिले. अकोल्यात ऐनवेळी पक्षाला सोडून गेलेल्यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीला सोडलेल्यांची अशीच अवस्था होते, असं सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना नाव न घेता टोला लगावला.
नगर जिल्ह्यातून राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माझ्याकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment