आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणार, राज्यात लवकरच ‘प्रोजेक्ट- 112’

 नागरिकांना त्वरीत मदत मिळण्यासाठी ‘प्रोजेक्ट- 112’ लवकरच कार्यान्वित

- गृहमंत्री अनिल देशमुख

Ø क्रिकेट जुगारामधील मोठ्या सट्टेबाजांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशयवतमाळ, दि. 21 : महिलेवर अत्याचार, अपघात, मोठी दुर्घटना, आग यासारख्या आपात्कालीन संकटात नागरिकांना त्वरीत मदत मिळण्यासाठी राज्यात ‘प्रोजेक्ट- 112’ लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यात व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

जिल्हा पोलिस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.

आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरीत मदत मिळवून देणे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले, यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जीपीएस सिस्टीम लावण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणावरून माहिती मिळाली तर संपूर्ण यंत्रणा त्वरीत घटनास्थळी पोहचण्यास मदत होईल. यवतमाळमध्ये या अनुषंगाने पोलिस विभागांतर्गत 232 जणांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. राज्यात 12500 जणांची पोलिस भरती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील 5300 जणांच्या भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरीत पोलिस भरती दुस-या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट बेटींग संदर्भात गृहमंत्री म्हणाले, नागपूर आणि यवतमाळमध्ये क्रिकेटवर सट्टा लावण्याचे मोठे प्रमाण आहे. नागपूरपेक्षाही यवतमाळ मुख्य केंद्र म्हणून पुढे आले आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस विभागाने नुकतेच क्रिकेट जुगारासंदर्भात मोठी कारवाई केली, ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. मात्र तरीसुध्दा संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यात समाविष्ठ असलेल्या मोठमोठ्या सट्टेबाजांवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील वादग्रस्त मालमत्ता संदर्भात गुन्ह्यांची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले. तत्पूर्वी गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post