भारतातील पहिलाच अजस्त्र 'मावळा' खोदणार बोगदा

भारतातील पहिलाच अजस्त्र 'मावळा' खोदणार बोगदा मुंबई: कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या 'मावळा' या अजस्त्र टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला.


याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुढील मुद्दे मांडले:


कोरोनाच्या लढाईत जगाने दखल घ्यावी असे काम मुंबई महानगरपालिकेने केले. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक “मावळ्यांची” कामगिरी महत्त्वाची ठरेल. माझी मुंबई आणि माझी महानगरपालिका हा मुंबईकरांचा अभिमान आहे.


त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहोत. मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण आहे.


२०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना मांडली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या या क्षितीजावर समुद्री मार्गही शोभून दिसणारा आहे. यासाठी आपण अप्रतिम असे नियोजन केले होते.


कामही धुमधडाक्यात सुरू केले होते. पण, मध्येच कोरोनाचे संकट आले. अजूनही ते गेलेले नाही. तरीही अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही. कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या  मावळ्यांची गरज असते.


तसे या कामात या मावळा यंत्राचे काम असेल. रणांगणात मावळाच लढत असतो. तसे या मुंबई महापालिकेच्या या कामात आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, हे काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी हे सगळेच असे मावळे आहेत.


१९९५-९९ मध्ये युती सरकारच्या काळात वाहतुकीची समस्या जाणवू लागताच आपण मुंबईत ५५ उड्डाणपूल उभे केले. आता तेही पूल कमी पडायला लागले आहेत. उपनगरातील जनतेला थेट शहरात अधे-मधे न थांबता यायचे झाल्यास आता हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा प्रवासही नयन रम्य होणार आहे.


मुळात या समुद्री मार्गात भूयारी मार्गच मोठ्या लांबीचा आहे. त्या कामाची आपण आज सुरुवात करणार आहोत. हा भुयारी मार्ग थेट मलबार हिल खालून, गिरगाव चौपाटीवर निघणार आहे. हे काम लवकरात लवकर म्हणजे नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल, असा विश्वास आहे.


उपनगरांतून येणाऱ्या मुंबईकरांसाठी तो लवकरात लवकर वापरात येईल, अशी आशा आहे. या कामांसाठी सर्वांनाच शुभेच्छा!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post