शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच देण्यात येईल – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अडवणूक करु नये
मुंबई, दि. 14 : ‘राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, टी.सी. इत्यादी प्रमाणपत्राची अडवणूक न करता विद्यार्थ्यांना ते तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, शिष्यवृत्ती मान्य करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अनुदानाद्वारे देय असून ती लवकरच देण्यात येईल, अशी महिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी दिली.
‘राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात शिष्यवृत्तीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही महाविद्यालयांना शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, टी. सी (Transfer Certificate) देण्यास अडवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले’ असे श्री.तनपुरे यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक, बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत दि.13 रोजी राज्यमंत्री तनपुरे यांनी शिष्यवृत्तीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उप सचिव सतीश तिडके, अवर सचिव श्रीमती अश्विनी यमगर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे चंद्रकांत वडे, महा आयटीचे प्रसाद कोलते, यशवंत चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.सन 2018-19 पासून डीबीटीद्वारे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालये यांना उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने मान्यता दिल्याप्रमाणे अनुज्ञेय “इतर फी” ची रक्कम शक्य तेवढ्या लवकर अदा करण्यासंदर्भात MAHA IT विभाग, तंत्रशिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभागाने संयुक्तपणे कार्यवाही पार पाडावी, असेही निर्देश श्री.तनपुरे यांनी दिले.
2018-19 पासून महाविद्यालयांच्या इतर फी (ज्यात वेगवेगळी 36 शिर्षक आहेत) संदर्भातील तांत्रिक अडचणी समन्वयाने दूर करण्यात येवून लवकरात लवकर महाविद्यालयांना रक्कम प्रदान करण्यात येईल. शिष्यवृत्तीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी सरकार घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशा विश्वास श्री.तनपुरे यांनी व्यक्त केला.
Post a Comment