महिला आणि बालकांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन
मुंबई, दि. 12 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला आणि बालकांचा विकास आणि संरक्षणाच्या बाबींमध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करत ‘सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ घडवण्यात मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले. आगामी वर्षभरात राज्यातील सर्व अंगणवाड्यांची स्वत:ची इमारत, नळजोड, वीजजोड, स्वच्छतागृह असतील हे लक्ष्य ठेऊन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय अभिसरण आणि आढावा परिषद सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. ठाकूर बोलत होत्या. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक श्रीमती आर. विमला, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, युनिसेफच्या आहार तज्ज्ञ डॉ.अपर्णा देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
अंगणवाड्यासाठींच्या आकार अभ्यासक्रमाबाबतच्या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच अंगणवाडी सेविकांसाठीच्या एलआयसी विमा योजनेच्या लाभासाठी तयार केलेल्या ऑनलाईन यंत्रणेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
Post a Comment