भाऊ 15 तारखेला गावाकडे येताय ना? गाडी पाठवतो...सगळी व्यवस्था करतो

 भाऊ 15 तारखेला गावाकडे येताय ना? गाडी पाठवतो...सगळी व्यवस्था करतो

शहरात वास्तव्य असलेल्या मतदारांचा ‘भाव’ वधारलानगर ः(सचिन कलमदाणे): जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वेग घेतला असून, गावपातळीवरील राजकारणात आता शहरातील नेत्यांकडून प्रचाराची राळ उठवली जात आहे. त्यातच गावाकडे मतदार यादीत नाव असलेल्यांचा शोध घेवून त्यांना गावाकडे येण्यासाठी आर्जव केले जात आहेत. अटीतटीच्या या निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असल्याने शहरात वास्तव्यास असलेल्या मतदारांना फोन, एसएमएसव्दारे 15 तारखेला गावाकडे येण्याचा आग्रह धरला जात आहे. अगदी गावाकडे येण्याचा जाण्यासाठी गाडीसह अन्य सर्व व्यवस्था तब्ब्येतशीर करण्याचे आश्वासन दिले जात आहे. तुम्ही फक्त दहा मिनिटं येवून जा...मतदान करा...बाकीचे सगळे आम्ही करू, अशी विनवणी उमेदवार मंडळी करीत आहेत. काही महिन्यांपूर्वीच करोना काळात याच शहरवाल्यांना गावागावात वेशीवरच रोखण्यात आले होते. तुम्ही तुमच्या शहरातच बरे...आता गावात अशी ब्याद नको अशी भावना त्यावेळी व्यक्त व्हायची. मात्र निवडणुका लागल्यावर सगळ्यांचाच नूर पालटला असून काहीही करा पण मतदानाला गावात या, असे आर्जव आता केले जात आहेत. शहरातील मतदारही आपला वधारलेला भाव पाहून खुषीत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post