दिल्ली ते मुंबई 1460 कि.मी.चा पल्ला सायकलवर 5 दिवसात पूर्ण करण्याची कामगिरी

 दिल्ली ते मुंबई जी टू जी राईड यशस्वी पूर्ण करणारे

जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय स्वागत
1 हजार 460 किलोमीटरचा पल्ला सायकलवर पाच दिवसात पुर्ण


अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्ली ते मुंबईदरम्यान 1 हजार 460 किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण करुन शहरात आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले. चौका-चौकात वधवा यांच्यावर फुलांची उधळण करीत तर गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांचे जंगी स्वागत झाले.
जी-टू-जी सायकल राईड नगरकरांच्या प्रेरणेने पूर्ण केल्याबद्दल शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री विशाल गणेश मंदिरात दर्शन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली. जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आमदार संग्राम जगताप यांनी वधवा यांचे स्वागत केले. वधवा यांच्यासह सहा सायकपटू स्वागत रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सायकल रॅलीद्वारे सायकल चालवून प्रदुषण थांबविण्याचा व आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश देण्यात आला. या रॅलीचे मराठा सायकल सेंटर, कापड बाजार असोसिएशन, ईश्‍वर बोरा, नारंग परिवार, लोकसेवा हॉटेल, राजू मदान, आशिष खंडेलवाल, केतन बलदोटा यांच्या स्वागत करुन वधवा यांचा सत्कार केला.  
शहरातून निघालेल्या सायकल रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय येथे झाला. जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने जस्मितसिंह वधवा यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक रोशन पंडित, श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, जनक आहुजा, देवेंद्रसिंह वधवा, हरजितसिंह वधवा, अतुल डागा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रदीप पंजाबी, प्रीतम भगवानी उपस्थित होते.
जस्मितसिंह वधवा यांनी जी-टू-जी सायकल राईडच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबईचा 1 हजार 460 किलोमीटरचा सायकल प्रवास पाच दिवसात पूर्ण केला. यामध्ये रोज 250 किमी 12 ते 18 तास सायकल चालवून हा खडतर प्रवास पुर्ण केला. 
संग्राम जगताप यांनी दिल्ली ते मुंबई सायकल राईड पुर्ण करुन वधवा यांनी अहमदनगरचे नांव उंचावले असल्याची भावना व्यक्त करुन, प्रदुषण टाळण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी सायकल चालविण्याचा युवकांना आवाहन केले. पोलीस मुख्यालय येथील समारोपीय कार्यक्रमात हरजितसिंह वधवा व लकी सेठी यांनी जस्मित वधवा यांची खेळात असलेली आवड स्पष्ट करुन त्यांची सायकलिंगची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. जस्मितसिंह वधवा यांनी दिल्ली ते मुंबईच्या सायकल राईडसाठी मागील सहा महिन्यापासून तयारी सुरु होती. कठोर परिश्रम, जिद्द व नगरकरांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करु शकल्याचे सांगून, पुढील ध्येय काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल राईडचा संकल्प व्यक्त केला. तर नगरमधून पुढील जी टू जी सायकल राईडसाठी पाच सायकलपटू पाठविण्याचा मानस व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post