टेम्पो दूधाचा आणि वाहतूक गोमांसाची...पोलिसांनी केली कारवाई

टेम्पो दूधाचा आणि वाहतूक गोमांसाची...पोलिसांनी केली कारवाईनगर - दुधाच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे गोमांस नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून मुंबईला नेण्यात येत होते. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार टन गोमांस व वाहतुकीकरिता वापरला जाणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी  पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर करत मुंबईतील टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले. नाथा मनोहर रसाळ (४२, रा.  मानखुर्द मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. 

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दुधाच्या वाहनातून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोमांस वाहतूक होत असलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. रविवारी पहाटे  दूध नाव लिहिलेल्या टेम्पोची तपासणी पोलिसांनी केली. या टेम्पोत मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. चार लाख रुपये किमतीचे चार टन गोमांस व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईवेळी जप्त करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post