पोलिसांनी आलिशान बंगल्याचा दरवाजा तोडताच स्वामी झाला पोलिसांच्या स्वाधीन
नगर : एखादा गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिस मोठा फौजफाटा घेवून जातात आणि त्या गुन्हेगाराच वास्तव्य असलेल्या घराला विळखा घालतात. पण आरोपी काही केल्या शरण येत नाही. अशावेळी पोलिसांना गेट, दरवाजा तोडून आत घुसुन त्याला अटक करावी लागते. असा प्रकार अनेकवेळा सगळ्यांनी चित्रपटात पाहिला असेल. पण अशी कारवाई नगरमध्ये पोलिसांना प्रत्यक्ष करावी लागली. भिंगारमधील स्वामी रेसिडेन्सी या मोठ्या बंगल्यात असलेला आरोपी लॉरेन्स स्वामी या अटक करताना पोलिसांना अशीच कसरत करावी लागली. सकाळीच मोठा फौजफाटा स्वामीच्या बंगल्यावर गेला. एका दरोड्याच्या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामीला अटक करायची होती. पण पोलिस आल्याच कळताच आरोपीनं बंगल्यात स्वत:ला बंदिस्त केले व सगळे दरवाजे, गेट बंद करून टाकले. पोलिस ध्वनीक्षेपकावरुन त्याला बाहेर येण्याच आवाहन करीत होते. परंतु, तो दाद देत नव्हता. या काळात त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठीही प्रयत्न केले. जवळपास सात आठ तास थांबूनही आरोपी दाद देत नसल्यानं पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वामी बाहेर आला व पोलिसांनी त्याला अटक केली. स्वामीविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment