दिव्यांग सहायता उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म

 

दिव्यांग सहायता उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्ममुंबई, दि. ११ : खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून येत्या १२ डिसेंबर रोजी याचे लोकार्पण करणार असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांनी शुक्रवारी (दि. ११) पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते.

श्री.मुंडे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर अशी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही.

समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

‘महाशरद’ प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ शुक्रवारी (दि.१२) सुरू होत असून मार्च – २०२१ अखेरपर्यंत मोबाईल ॲप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.

‘महाशरद’चा ‘महाराष्ट्र स्टेट हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग’ असा विस्तार असून खासदार श्री.पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण करताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सुमारे 29 लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post