स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे शेतकरी मेळावा

 स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे शेतकरी मेळावा संपन्नश्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व एफ.एम.सी. इंडिया प्रा. ली., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे करण्यात आले. 

सदर कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक, दहिगाव-ने चे सरपंच श्री. सुभाष पवार, एफ.एम.सी. पुणेचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्री. सुधीर गरड, गणेश शेळके व रावसाहेब पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ मोठी धरणे व त्यांच्या अंतर्गत पाणी कालवे यामुळे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे ऊस पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी किटक नाशकांचा वापर तसेच तण नियंत्रणासाठी तण नाशकांचा वापर केला जातो.

परंतु शिफारस केल्याप्रमाणे त्यांचा वापर केला जात नाही त्यामुळे त्यांचा विपरीत परिणाम शेती तसेच पिकावर होतो. हे टाळण्यासाठी एकात्मिक पद्धतीने किड व तण नियंत्रण करण्याचे आवाहन श्री. सुधीर गरड यांनी केले. श्री. गरड यांनी ऊस पिकामध्ये ३५ ते ४० दिवसानंतर क्लोरंट्रानिलिप्रोल या किटक नाशकाचा शिफारशीप्रमाणे वापर करण्याचे सांगितले.

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे प्रमुख डॉ. कौशिक यांनी रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापनाबद्दल तसेच ऊस पिकातील एकात्मिक तण नियंत्रण या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ऊस पिकात खोड कीड त्याचप्रमाणे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो त्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतींचा वापर करण्यासंबंधी शेतकऱ्यांना श्री. माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास एफ.एम.सी. प्रा.लि. पुणे चे तुषार शिंदे, सुयोग वानखडे, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लोखंडे, बन्शी धोंडे, भारत पवार, अनिकेत खरड, अविनाश नीळ इत्यादी शेतकरी तसेच कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. सचिन बडधे, प्रकाश बहिरट व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील मोठ्याप्रमाणात प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. 

कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी केव्हीके चे शास्त्रज्ञ इंजि. राहुल पाटील, प्रविण देशमुख व इतर सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश शेळके व आभार श्री. नारायण निबे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post