नवीन करोना स्ट्रेन...चूक झाली तर जबर भुर्दंड बसेल


नवीन करोना स्ट्रेन...चूक झाली तर जबर भुर्दंड बसेल

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन करोना स्ट्रेनवरून आ.रोहित पवारांचा सतर्कतेच आवाहन

  कोविड-१९ च्या संकटाला संपूर्ण जग सामोरं जात असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा (VUI-2020 12/01) हा नवीन स्ट्रेन सापडलाय. हा नवा स्ट्रेन OUT OF CONTROL म्हणजेच अत्यंत झपाट्याने पसरणारा असून सध्याच्या कोरोना व्हायरसपेक्षा ७०% अधिक वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.

कोरोना व्हायरस हा RNA आहे. आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तो अनेक RNA कॉपी करतो. कॉपी करण्याच्या प्रक्रियेत चूक होऊन नव्या प्रकारचा RNA बनून जातो. हा व्हायरस ज्यांच्या शरीरात तयार होतात ती लोक अधिक वेगाने इतर लोकांपर्यंत हा वायरस पसरवतात. या व्हायरसचे संभाव्य धोके लक्षात घेता ब्रिटन सरकारने लंडनसह प्रभावित भागात अत्यंत कडक लॉकडाऊन (TIER 4) केलाय आणि इतर देशांनीही ब्रिटन मधून येणाऱ्या सर्व फ्लाईट बंद केल्या आहेत. तसंच जागतिक आरोग्य संघटनेलाही याबाबत सूचित करण्यात आलं.
यावर आपल्या सरकारनेही त्वरित आंतरराष्ट्रीय विशेषतः ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाईट ३१ डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये तयार झालाय की ब्रिटनबाहेर दक्षिण आफ्रिकेमध्ये हे अद्याप माहित नाही. याबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. पण हा स्ट्रेन ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असल्याचं गेल्या आठवड्यापासून लक्षात आलं. त्यामुळं फक्त ब्रिटन मधून येणाऱ्या फ्लाईट बंद करून चालणार नाही तर इतर देशांच्या फ्लाईटबाबतही वेळीच योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. तसंच गेल्या आठवड्याभरात ब्रिटन किंवा इतर युरोपीय देशातून भारतात प्रवासी आले असतील तर त्यांच्याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत तज्ज्ञांकडून संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यात आली आहेच. त्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.
राज्याचा विचार करायचा झाला तर #मविआ सरकारने नागरिकांच्या सहकार्याने आणि कोरोना योध्यांच्या मेहनतीने कोरोनाचं संकट अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळलं. तीच तत्परता आणि तशीच काळजी नवीन स्ट्रेनच्याबाबत घ्यावी लागणार आहे. कारण या नवीन स्ट्रेनमुळं कोविड-१९ च्या पेशंटमध्येही पुढील महिन्यात आणखी वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. मुंबई, पुणे विमानतळावर सध्या तपासणी केली जाते पण नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर ती अधिक कठोर करावी लागणार आहे. यात किंचितही निष्काळजीपणा करून चालणार नाही. तसंच आयसोलेशनबाबतही कडक नियमावली बनवून त्याचीही कठोरपणे अंमलबजावणी करावी लागेल. नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळला म्हणजे आपल्या देशात नाही होणार नाही, असं नाही. नवा स्ट्रेन आपल्याही देशात तयार होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेऊन सरकारी सूचनांचे पालन करणं गरजेचं आहे. कारण आता कुठं हळूहळू रुळावर येण्यास सुरुवात झालेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा लॉक डाऊन कदापि परवडणार नाही.
मला विश्वास आहे, केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे हे नागरिकांच्या सहकार्याने या नवीन स्ट्रेनला आपल्या देशात शिरकाव करू देणार नाहीत. मात्र त्यात चूक झाली तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला त्याचा जबर भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post