आवाजाचा नमुना देण्याबाबत डॉ.दत्ताराम राठोड यांना न्यायालयाकडून दिलासा

 आवाजाचा नमुना देण्याबाबत डॉ.दत्ताराम राठोड यांना उच्च न्यायालयाकडून दिलासानगर : एका पोलिस कर्मचार्‍यासमवेत तत्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांनी केलेल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांत व्हायरल झाली होती. याप्रकारानंतर राठोड यांची बदलीही झाली होती. आता या आक्षेपार्ह संभाषणाच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना दिलासा देत आवाजाचा नमुना देण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर पुढील सुनावणी 4 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने केलेल्या अर्जावर जिल्हा न्यायालयात 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी होऊन राठोड यांनी आवाजाचा नमुना द्यावा, असे आदेश दिले होते. या आदेशाला राठोड यांनी ऍड. नितीन गवारे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. यावर बुधवारी न्यायालयाने आवाजाचा नमुना घेण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचारी संभाजी गर्जे व दत्ताराम राठोड यांच्यातील आक्षेपार्ह संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ऑक्टोबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत वरिष्ठांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. व्हायरल क्लिपची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांना राठोड यांच्या आवाजाचा नमुना हवा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post