जिल्हा परिषदेमार्फत जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशिनचे लोकार्पण

         सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याला मदत करणे हे कर्तव्य : राजश्री घुले

जिल्हा परिषदेमार्फत जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशिनचे लोकार्पणनगर : नगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने पशुधन सांभाळताना, त्यांचे आरोग्य राखताना शेतकर्‍यांना मेहनत घ्यावी लागते. जनावर एखाद्या आजाराने खाली बसल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी जनावर उचलणे कठिण होते. अशावेळी काऊ लिफ्टिंग सारखे मशिन मोलाची मदत करणारे आहे. पशुपालक असलेला शेतकरी हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची जास्तीत जास्त काम शेवटच्या घटकापर्यंत पोहचिवण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना काऊ लिफ्टींग मशिनचे वाटप करण्यात आले आहे.याप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके, पशू संवर्धन आणि अर्थ समिती सभापती सुनील गडाख, सभापती मीराताई शेटे, जिल्हा परिषद सदस्य रामहारी कातोरे, रामभाऊ साळवे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगल वराडे, डॉ.वृषाली भिसे, डॉ.चंद्रशेखर सोनावळे, ज्ञानेश्वर गांगर्डे यांच्यासह जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

प्रताप शेळके म्हणाले की, वातावरणामुळे गायींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. एकदा ती बसल्यावर तिला उचलण्यासाठी खूप अडचणी यायच्या. यापार्श्वभूमीवर काऊ लिफ्टिंग मशिन अतिशय फायदेशीर ठरणार्‍या आहेत. जनावरांच्या बाजारात शेतकर्‍यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. ती टाळण्यासाठीही सोनोग्राफी मशिन बसविण्याचे धोरण जिल्हा परिषद राबविणार आहे.

सुनिल गडाख म्हणाले की, नगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्‌या मोठा असल्याने सुविधा देताना अडचणी निर्माण होतात. पण जिल्हा परिषदेने कायम त्यावर मात केली आहे. अनेक वर्षांपूर्वी पशुधन कमी असतानाच्या काळात जिल्हा परिषदेने पंजाबमधून रेल्वेने गाया आणून दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन दिले. या व्यवसायातून अनेकांचे संसार उभे राहिले. महाराष्ट्रात कोणत्याच जिल्ह्यात नसलेले काऊ लिफ्टिंग मशिन नगर जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. अतिशय मोठे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. जनावरांच्या बाजारात गाभण जनावराची निश्चित माहिती मिळत नसल्याने शेतकर्‍यांची अनेकदा फसवणूक होते. हे टाळण्यासाठी लोणी, काष्टी, घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारात सोनोग्राफी मशिन बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ.सुनिल तुंबारे यांनी सांगितले की, पॅरेलेस, कॅल्शइम कमी असणे, प्रसूतीनंतर अशक्तपणा इत्यादी कारणांमुळे जनावर बसणे हा आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. जनावर गाभण असतानाही वजन वाढते. जनावर बसल्यावर त्याच्यावर उपचार करताना अडचणी येतात. अनेकदा जनावराला जखमा होतात, मृत्युही होतो. त्यासाठी जनावरांना उचलणे सहजपणे होईल अशा काऊ लिफ्टिंग मशिन उपयुक्त ठरणार आहेत. 200 मशिनची खरेदी जिल्हा परिषदेने केली असून ती संपूर्ण जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post