नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत
मुंबई, दि. 7 : नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.
साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले.त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.
वेबिनारच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर,डॉ. स्मिता राणे उपस्थित होते.
रिक्त पदभरतीला चालना- आरोग्यमंत्री राजेश टोपे
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नर्सेसच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील.
सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल.
Post a Comment