थेट मंत्रालयातून आदेश आल्यावर कुत्र्याच्या पिल्लाला मिळाले उपचार

  थेट मंत्रालयातून आदेश आल्यावर कुत्र्याच्या पिल्लाला मिळाले उपचार

निर्ढावलेल्या पशुवैद्यकीय यंत्रणेचा पशुपालकाला आलेला अनुभव

जनावरांच्या उपचारांसाठी प्रत्येक वेळी मंत्र्यांचे आदेश आणायचे का?नगर : मुक्या जनावरांनाही चांगले उपचार मिळावेत, त्यांची सुश्रुषा व्हावी यासाठी राज्य सरकार पशुसंवर्धन विभागावर कोट्यवधींचा खर्च करते. या खात्याव्दारे नियुक्त पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जनावरांवर उपचार करणे अपेक्षित असतं. नगरमध्ये मात्र हा विभाग केवळ कागदावरच आहे की काय अशी परिस्थिती आहे. गणेश शिंदे या नगरपासून 70-80 किलोमीटर दूर अंतरावरील रहिवाशाला याचा अनुभव नुकताच आला. जखमी झालेल्या एका कुत्र्याच्या उपचारासाठी त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांना विनंती केली. त्यावर त्यांनी त्यांना थेट नगरचा रस्ता दाखवला. यावर शिंदे यांनी थेट मंत्रालयात फोनाफानी केली. मंत्रालयातून आदेश सुटताच डॉक्टरांनी लगेचच संबंधित गावात धाव घेवून पाय मोडलेल्या कुत्र्यावर उपचार केले. कर्तव्य बजावण्यासाठी डॉक्टरांना थेट मंत्रालयातूनच आदेश द्यावे लागत असतील तर त्यांच्या नियुक्तीचा फायदा काय असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. 

याबाबत गणेश शिंदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकली आहे. ‘आमच्या कुत्र्याचा पाय मोडला आम्ही प्राथमिक उपचार आम्ही आमच्या पातळीवर केले. मात्र याला काहीही अर्थ नाहीय हे लक्षात आले. आजूबाजूला पशुवैद्यकीय दवाखाना नाहीय. गावासाठी नेमलेल्या डॉक्टर यांना संपर्क केला नेमकी अडचण सांगितली. त्यांनी अगोदरच क्लइर केलं की तुम्हाला अहमदनगरला जावं लागेल म्हणून. साधारणतः आमच्या पासून जिल्हा रुग्णालय हे 70-80 कि.मी. आहे. इतक्या लांब घेऊन जाणे पण शक्य नाहीय. तालुक्यातील डॉक्टरांशी कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी सर्वांनीच सरळ जिल्ह्याच्या दिशेने बोट दाखवले. 

एकंदरीत कुत्र्याच्या पिल्लाला होणारा त्रास पाहता नेमके काय ते कळेना... उपचार तर केले पाहिजेत. इतर सगळे दुर्लक्ष करत आहेत अशा परिस्थिती मध्ये मी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी संपर्क केला. त्यांचे वैद्यकीय खात्याचे स्वीय सहाय्यक डॉ.लहू वडापुरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करून उपचार करण्याचे आदेश दिले. रात्री 8-9 च्या दरम्यान त्यांनी  40-50 किलोमीटरचा प्रवास करून उशिरा येऊन त्याची तपासणी केली व त्याच्या पायाला प्लास्टर केले आणि योग्य प्रकारे उपचार केले. 

पालकमंत्री ना श्री. दत्तात्रय भरणे मामा यांनी अशा लहान वाटणार्‍या मात्र तितक्याच महत्वपूर्ण अशा बाबतीत सहकार्य केल्याच्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मंत्रालयातून एकच फोन आणि काम डन... शासकीय यंत्रणा ही ज्या गोष्टीच्या बाबतीत आहे त्यासाठी तिने काम केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सुस्तावलेली यंत्रणा पुन्हा घोड्या सारखी पळाली पाहिजे. हीच एक शेतकरी तथा पशूपालक म्हणून इच्छा आहे !, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post