श्रमदानातुन स्वच्छतेकडे...... सामाजिक संघटनानी उभारले अभियान

 


श्रमदानातुन स्वच्छतेकडे...... सामाजिक संघटनानी उभारले अभियान
 कर्जत (आशिष बोरा,):- कर्जत शहरात सुरू असलेला सामाजिक संघटनांचा श्रमदान करत स्वच्छता करण्याचा जागर ऐन दिवाळीच्या दिवसात ही बंद पडला नाही व सर्वानी सदासुदीच्या दिवसातही विविध ठिकाणी श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबविली. 

             स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत कर्जत शहराने आघाडीने घेण्याच्या दृष्टीनेप्रयत्न सुरू केले असून या मध्ये नगर पंचायतीच्या खांद्याला खांदा लावून शहरातील विविध सामाजीक संघटना हिरारीने उतरल्या आहेत, दररोज सकाळी साडे सहा ते साडेसात या वेळेत शहरातील एका भागात जाऊन हातात विविध साहित्य घेत तो भाग स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करण्याचे काम 2 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले आहे यामध्ये रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, भारतीय जैन संघटना, कर्जत हरित अभियान, आजी माजी सैनिक संघटना, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप, राजमुद्रा ग्रुप, कर्जत तालुका पत्रकार संघ, एस एस वाय ग्रुप, शिक्षक वृंदासह अनेकदा विविध अधिकारी, नगरसेवक व नगर पंचायतचे पदाधिकारी  ही सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. वर्षोनवर्ष पडलेला कचरा व त्यामुळे बनलेला उखंडा यामध्ये शिरून तो साफ कारण्याचे काम करताना पाहून अनेक जण अचंबित होत आहेत, अनेक लोक ज्या ठिकाणी उभे राहणे पसंत करत नाहीत अशा ठिकाणी जाऊन काम करण्याचे गलिच्छ समजले जाणारे काम विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत हसत हसत व खेळीमेळीच्या वातावरणात करत असून यामुळे नगर पंचायतच्या कर्मचाऱयांना ही हुरूप आला आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या नगर पंचायत च्या कर्मचार्याना मान सन्मान देत अत्यंत अदबीने त्यांना ही सर व मॅडम म्हणण्याची प्रथा या सर्वानी सुरू केली आहे.  

                 कर्जत तालुक्यात दोन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशन बरोबर भारतीय जैन संघटनेने सुरू केलेल्या श्रमदान चळवळीत ही रोटरी सह विविध सामाजीक संघटनानी भाग घेऊन दोन वर्षे तालुक्यातील विविध गावात जाऊन श्रमदान करत जलासंधारणाची कामे केली होती, त्यातील सदस्यांसह काही नव्याने सदस्य जोडले गेले असून या सर्वानी कोणतेही गट तट न करता कर्जत शहरात मी कर्जतकर असे समजून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केलेली असून यामध्ये दिवसेंदिवस श्रमदात्याची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.

               कर्जत शहरातील विविध शासकीय कार्यालये, मंदिरे,सार्वजनिक ठिकाने, बस स्थानक, शाळा आदी भागात जाऊन आता पर्यत अविरतपणे श्रमदान सुरू असून दिवाळीच्या काळात ही या श्रमदानाला खंड पडू न देता शहरातील ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिर, श्री नागेश्वर मंदिर, श्री विठठल मंदिर श्री पार्श्वनाथ मंदिर, श्री हनुमान मंदिर, जैन स्थानक आदी भागात श्रमदान करण्यात आले, पाडव्या दिवशी श्री गोदड महाराजाच्या जनस्थळ (ध्यान मंदिर) परिसरात श्रमदान करून शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. 

                दररोज वेगवेगळ्या भागात जाऊन एक तास श्रमदान केल्यानंतर परिसरातील नागरिकां ची जनजागृती करण्याचे काम ही केले जात असून  करून स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत च्या जोरदार घोषणा बाजीने परिसर दणाणून सोडला जात आहे, या सामाजिक संघटनाच्या श्रमदाना शिवाय नगर पंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी ही विविध भागात जाऊन श्रमदान करत स्वच्छता करत आहेत.

                 कर्जत शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घरातच चार भागात विलगिकरन करावा यामध्ये ओला कचरा , सुका कचरा, घातक कचरा व सॅनीटरी कचरा वेगवेगळा नगर पंचायला द्यावा, कोणीही घराबाहेर कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात येत आहे. कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी फक्त नगरपंचायतच्या अधिकरी पदाधिकारी, नगरसेवक,  कर्मचारी यांचीच नसून शहरातील नागरिकानी त्यात सक्रिय सहभाग घेतला तर या स्वच्छता अभियानास अधिक गती येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना, तरुण मंडळे, ग्रुप, महिला मंडळे, यांनी यात सक्रिय व्हावे असे आवाहन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post