हिंमत जाधव खून प्रकरणी 7 आरोपींना जन्मठेप, 1 लाख 19 हजारांचा दंड

 हिंमत जाधव खून प्रकरणी 7 आरोपींना जन्मठेप, 1 लाख 19 हजारांचा दंडनगर : सप्टेंबर 2016 मध्ये नगर औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात झालेल्या हिंमत जाधव खून प्रकरणात सातही आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी आज हा निकाल दिला. आरोपींना एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 

आरोपींमध्ये कृष्णा अशोक कोरडे (वय 26, इंद्रानगर, ता.माजलगाव, जि.बीड), सोमनाथ भानुदास मोरे (वय 31, रा.शिंगणापूर, ता.नेवासा), अजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय 29, रा.जामगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), रामचंद्र उर्फ राजू चिमाजी शेटे  (वय 44, रा.वळणपिंप्री, ता.राहुरी), संदीप बहिरुनाथ बहिरुनाथ थोपटे (वय 29, रा.कृषी विद्यापीठ, ता.राहुरी), राहुल बाबासाहेब दारकुंडे (वय 28, रा.मोरगव्हाण, ता.राहुरी), जावेद करीम शेख (वय 36, रा.देवगाव, ता.नेवासा) यांचा समावेश आहे. दि.13 सप्टेंबर 2016 रोजी हिंमत जाधव व त्याचा मित्र संतोष चव्हाण नगरहून दुचाकीवरून जात असताना इमामपूर घाटात त्यांची गाडी अडवून आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी संतोष चव्हाण याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द फिर्याद दिली होती. पोलिसांनी सखोल तपास करून तत्कालिन सहायक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी  एकूण 25 साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी राजू शेटे याने मयताबरोबर असलेल्या शत्रुत्त्वापोटी आरोपी कृष्णा रोकडे, सोमनाथ मोरे, अजिनाथ ठोंबरे यांना हिंमतला मारण्यासाठी सुपारी दिली. घटनेच्या दिवशी आरोपी संदीप थोपटे, राहुल  दारकुंडे यांनी मयताचे लोकेशन गोळ्या झाडणार्‍या आरोपींना वेळोवेळी दिले.  खटल्याच्या सुनावनीअंती न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवले. त्यानुसार सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोहेकॉ बी बी बांदल, पो कॉ. दीपक गांगर्डे यांनी सहायक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांना सहाय्य केलं. तसेच जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post