नगरकरांना मनपाकडून दिवाळी भेट....75 टक्के शास्ती माफी जाहीर

 


नगरकरांना मनपाकडून दिवाळी भेट....75 टक्के शास्ती माफी जाहीरअहमदनगर : महानगरपालिकेने 1 नोव्हेबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी (1 महिन्यासाठी ) 75 टक्के शास्ती माफी जाहिर करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व सबंधीत थकबाकीदार मालमत्ताधारक यांनी या शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

      शास्तीमाफी संदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरूडे, मनोज दुलम, समद खान, विलास ताठे, उदय कराळे, उपायुक्त लांडगे आदी उपस्थित होते.

      सदर कालावधीमध्ये नोव्हेंबरअखेर सर्व प्रभाग कार्यालयाचे वसुली कार्यालय सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायं. 7 पर्यत  व रविवारी व सुटीच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत भरणा स्विकारण्यासाठी सुरू राहतील. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या शास्ती माफीच्या कालावधीनंतर ही जे मालमत्ताधारक आपली थकबाकी भरणार नाही अशांवर वसुलीसाठी जप्ती मोहिम आदीची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. करोना साथीमुळे मनपाच्या वसुलीवर मोठया प्रमाणात परिणाम झाला असून मनपाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता पर्यत 15.50 कोटी वसुली झाली असून आणखी मोठया प्रमाणात थकबाकी असून सदर थकबाकी एकूण रूपये 196 कोटी येणे आहे. त्यापैकी 94 कोटी रूपये निव्वळ थकबाकी असून रक्कम 102 कोटी रू. व्याजापोटीचे आहेत. सदर व्याजामध्ये 75 टक्के सुट देवून मुद्दल रक्कम वसुल करणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post