नगर परिषदेच्या कर्मचार्यांचे आ.मोनिका राजळेंच्या घरासमोर आंदोलन

 

नगर परिषदेच्या कर्मचार्यांचे आ.मोनिका राजळेंच्या घरासमोर आंदोलन
शेवगाव  :- शेवगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे ४ महिन्यांचे थकीत वेतन, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, दिवाळी सणासाठी १० हजार रुपये ऍडव्हान्स, जानेवारी व फेब्रुवारी या २ महिन्यांचे महागाई भत्ता देण्यात यावा, नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी जाहीर करावी या मागण्यांसाठी शेवगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सोमवार दि. ९ नोव्हेंबर पासून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून याच मागण्यांसाठी बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजप च्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी दिली.

वरील मागण्यांसाठी प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, सुरज मोहिते, भानुदास गायकवाड, जालिंदर कर्डक, दादासाहेब पोकळे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

सोमवारी सायंकाळपर्यंत शेवगाव नगरपरिषद प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा.क्रांती चौकात रास्तारोको आंदोलन करण्याची तयारी केली होती, तथापि मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी मध्यस्ती करीत शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ व कर्मचारी यांच्यात चर्चा घडवुन हे आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे जो पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कामगार संघटनेने घेतल्यामुळे हे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच होते.

आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानासमोर थाळी नाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते संजय नांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रंधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  दत्ता  फुंदे प्रशांत  भराट, बाळासाहेब फटांगरे,  सर्पमित्र भाऊ बैरागी आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post