नगर जिल्ह्यात करोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरू
*कोरोना प्रादुर्भाव घटलाय मात्र गाफील राहू नका*
*पालकमंत्री मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन*
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, त्यामुळे निष्काळजीपणा वाढणार नाही आणि प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.
रुग्ण संख्या घटल्यामुळे आता कोविड केअर सेंटरचा उपयोग पोस्ट कोविड केअर सेंटर म्हणून केला जाणार आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णांना काही त्रास जाणवत असेल तर त्यांना या सेंटरमध्ये उपचार केले जातील. यानंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सर्व जिल्हावासियांनी स्वताची आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या मोहिमेत आपण प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील जे सदस्य ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या प्रकृतीविषयी काही तक्रारी असतील, त्यांना उपचाराची गरज असेल यासंदर्भात पंचायत समिती स्तरावर कक्ष स्थापन करुन दूरध्वनीद्वारे याची माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोरोनावर लस लवकरच येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने लसीकरण मोहिम कशापद्धतीने राबवावी, यासाठी आरोग्य कर्मचारी यांचा डाटाबेस तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. ***
Post a Comment