फार्मसी क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा वैद्यकीय प्रतिनिधी मित्र परिवाराच्यावतीने सत्कार

 

फार्मसी क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा वैद्यकीय प्रतिनिधी मित्र परिवाराच्यावतीने सत्कारअहमदनगर (सचिन कलमदाणे)-: वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फार्मसीस्ट, वैद्यकीय प्रतिनिधी अशा सर्वांचा सहभाग असतो. यातील प्रत्येक घटकाने करोना काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वैद्यकीय प्रतिनिधी आपले उत्पादन डॉक्टरांपर्यंत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेतात. यातून रूग्णांपर्यंत चांगले उत्पादन पोहचण्यास निश्चितच हातभार लावतो. फार्मसीस्ट क्षेत्रानेही करोना काळात औषध पुरवठ्यात सातत्य राखण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. या सर्वांची एकजूट कौतुकास्पद असून फार्मसीस्ट व वैद्यकीय प्रतिनिधी यांचा एकोपा व बांधिलकी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन डॉ.गोपाळ बहुरुपी यांनी केले.

नगरमधील वैद्यकीय प्रतिनिधी मित्र परिवाराच्यावतीने फार्मा क्षेत्रातील मान्यवरांचा विविध क्षेत्रात ठसा उमटवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यात मनपाचे नूतन स्वीकृत नगरसेवक विपुल शेटिया, भाजपच्या शहर जिल्हा सचिवपदी निवड झालेले दत्ता गाडळकर, फार्मसी कौन्सील ऑफ इंडियाचे नूतन नगर जिल्हाध्यक्ष मनोज खेडकर यांचा गौरव डॉ.गोपाळ बहुरुपी व डॉ.हर्षवर्धन तन्वर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरमधील वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.) मित्र परिवार उपस्थित होते.

डॉ.तन्वर म्हणाले की, वैद्यकीय प्रतिनिधी मित्र परिवाराने फार्मसी क्षेत्रातील कतृत्ववानांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे. वैद्यकीय क्षेत्रात फार्मसीस्ट तसेच एमआर हे महत्त्वाचे घटक आहे. अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने ते या क्षेत्रात योगदान देत असतात.

नगरसेवक विपुल शेटिया म्हणाले की, करोनाकाळात वैद्यकीय क्षेत्राने अतुलनीय योगदान देत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.  डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फार्मसीस्ट तसेच वैद्यकीय प्रतिनिधी यांनी हातात हात घालून जनतेत व्यापक जनजागृती करताना सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या सर्वांची एकजूट व एकोपा असाच भविष्यातही कायम राहील यासाठी प्रयत्न करू. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना प्रत्येक घटकाने अशीच बांधिलकी जपली तर अनेक गरजवंतांना मदत करता येईल.

दत्ता गाडळकर म्हणाले की, क्रिकेट स्पर्धेच्या निमित्त नगरमधील वैद्यकीय क्षेत्रातील फार्मसीस्ट, एमआर अनेक वर्षांपासून एकत्र आले आहेत. आमचा एक मोठा परिवारच तयार झालेला आहे. वैद्यकीय प्रतिनिधी मित्र परिवाराने आमचा केलेला सत्कार आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

वैद्यकीय प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नगरमधील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फार्मसीस्ट व एमआर यांचे चांगले ऋणानुबंध जुळले आहेत. यातील अनेक जण राजकीय क्षेत्रात असले तरी सामाजिक कार्यात राजकारणापलिकडे जावून सगळे जण एकत्रित योगदान देत असतात. आमच्या क्षेत्रातील अनेक जण विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवतात हे अभिमानास्पद आहे. त्यामुळेच या सर्वांचा एकत्रित गौरव करताना विशेष आनंद होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post