लाटेला भुलून ‘कृतघ्न’पणा करणारे आज खड्यासारखे बाजूला पडलेत

 लाटेला भुलून ‘कृतघ्न’पणा करणारे आज खड्यासारखे बाजूला पडलेत

पवारांच्या ‘त्या’ सभेची आठवण काढत रोहित पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना सुनावलेनगर : महाराष्ट्राचे राजकारण फिरवणार्‍या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सातार्‍यातील भर पावसातील आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त आ.रोहित पवार यांनीही सोशल मिडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तत्कालिन भाजप लाटेला भुलून राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. 

वाचा काय म्हटले आहे आ.रोहित पवार यांनी.... 

एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी सातार्‍यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे. ही एक घटना आहे, पण अशा अनेक प्रसंगांना साहेबांनी धीरोदात्तपणे तोंड देत संकटांना परतवून लावलं, याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणार्‍या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही. साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे खुनशी विरोधकांना साहेब समजले नाही आणि समजणारही नाहीत. त्यामुळं त्यांनी साहेबांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्नच करु नये. साहेबांचं नेतृत्व कुठल्या लाटेत वर आलेलं नाही तर त्यामागे त्यांनी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ केलेली कठोर तपश्चर्या आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post