हुजर्या ते पेशव्यांचा मुख्य कारभारी...बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध लढणारे नगर जिल्ह्यातील थोर मुत्सद्दी

 हुजर्या ते पेशव्यांचा मुख्य कारभारी...बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध लढणारे नगर जिल्ह्यातील थोर मुत्सद्दी 



*सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १९१ वी पुण्यतिथी निमगावजाळी उत्साहात साजरी*



निमगावजाळी ( गौरव डेंगळे) :सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या १९१व्या पुण्यतिथी निमित्त के.आर.जोंधळे कृषी व ग्रामविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या इतिहासाची जाणीव करून देणारा फलकाचे अनावरण करून त्यांना अभिवादन देण्यात आले.


निमगावजाळी तील कार्यकर्त्यांनी त्रिंबकजीच्या वाड्याभोवती स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर रांगोळी काढून फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. तदनंतर प्रथमेश फुल हार घालून त्यांचे अभिवादन केले.

सोशल डिस्टन्सिंग पाळून व तोंडाला मास्क लावून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात  यांची १९१ वी पुण्यतिथी साजरी केली. यावेळी इतिहास अभ्यासक व लेखक श्री विठ्ठल शेवाळे, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव श्री सतीश जोंधळे, त्रिंबकजीच्या घराण्यातील पद्माबाई नाईक-जाधव, सरपंच श्री अमोल जोंधळे,त्रिंबकजींचे अभ्यासक सुमित डेंगळे तसेच भाऊ संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते..


*निमगावजाळीचे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १६ ऑक्टोबर रोजी १९१ वी पुण्यतिथी त्या निमित्ताने..*


परवा परवा दिमाखात उभे असलेले मराठी स्वराज्य सन १८१८ साली इंग्रजांच्या अधिपत्याखाली आले. भोसले,गायकवाड, शिंदे होळकर यांना एकजूट करता आली असती तर इतिहास निश्चितच वेगळा असता. ते स्वराज्य टिकाव म्हणून विशाल ध्येयासाठी स्वतःच्या आयुष्याचं राष्ट्रवेदीवर बलिदान करण्याची जी परंपरा शिवछत्रपतींनी या महाराष्ट्रात सुरू केली होती त्या मालिकेतील शेवटचं बलिदान देणारे *निमगावजाळी चे सरदार त्रिंबकजी डेंगळे* मात्र शेवटपर्यंत या स्वराज्यासाठी धडपड करत राहिले. एक सर्व सामान्य हुजऱ्या ते दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे प्रमुख कारभारी अशी मोठी गरुडझेप घेतलेले त्रिंबकजी डेंगळे. निमगावजाळी सारख्या सामान्य खेड्यात सामान्य घरात जन्म घेतलेला माणूस. सगळीकडे फितुरीच अमाप पीक आलेलं.स्वामिनिष्ठता दुर्मिळ होत चाललेली. पण त्रिंबकजी यांनी निष्ठेने दुसरे बाजीरावांची मर्जी संपादन केलेली. पेशव्यांचा तोफखाना त्यांच्यावर सोपविलेला. पुढे त्रिंबकजी यांनी इंग्रजांना शह देण्यासाठी भांबुरड्याला तोफांचा कारखाना सुरू केला. पुढे जाऊन अहमदाबाद सुभ्याचे सुभेदार पद मिळाले. असे  त्रिंबकजी पुढे जाऊन पेशव्यांतर्फे इंग्रज अधिकारी रेसिडेंट माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या मुत्सद्दी शी रोखठोक, सडेतोड भिडमुवर्त न ठेवता बोलणी करू लागले,निरुत्तर करू लागले.  पेशवे मराठी स्वराज्याचा घास घ्यायला टपलेल्या इंग्रजांच्या डोळ्यात त्रिंबकजी खटकू न लागले तर नवलच. आणि मग त्रिंबकजी विरुद्ध मोठं कटकारस्थान उभे राहिले. एका झेपावत्या गरुडावर आरोप प्रत्यारोप करून त्याचे पंख कापले गेले. खरा इतिहास ही दडपून ठेवला गेला. गंगाधरशास्त्री यांच्या खुनाचा आरोप त्रिंबकजी यांच्यावर ठेवण्यात आला व त्यांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवले गेले. पण हातावर मिठाई देत सुटका करून घ्यायचा आमचा इतिहास.. त्रिंबकजी तिथून निसटले. पुढे खानदेशात जाऊन भिल्ल लोक गोळा करून जुलुमी राजवटी विरोधात त्यांनी उठाव केला. इंग्रज राजवटी विरुद्ध असे आंदोलन सुरू केले म्हणून इंग्रजांनी पेशव्यांवर दबाव आणला. त्यासाठी पुरंदर,सिंहगड सारखे किल्ले ओलीस ठेवले गेले. इतिहासातील अशी व्यक्ती साठी किल्ले अमानत ठेवायची ही पहिलीच वेळ. शेवटी त्रिंबकजी यांची सासुरवाडी असलेल्या अहिरगाव इथे ते फिन्दफितुरी ने ते पकडले गेले. वाराणसी इथे चुनार च्या किल्ल्यात त्यांची रवानगी झाली. आणि अशा या थोर मराठा सरदार त्रिंबकजी यांची शेवट तिथेच १६ ऑक्टोबर १८२९ रोजी झाली आणि खऱ्या अर्थाने मराठेशाही अस्तास गेली...! पेशवाई म्हणजेच मराठी स्वराज्य टिकावे म्हणून इंग्रजांविरुद्ध पहिला उघडउघड उठाव करणाऱ्या सरदार त्रिंबकजी यांच्याच नावे पुण्यात डेंगळे उड्डाण पूल आहे!!!

अशा या थोर मुत्सद्दी कारभारी असलेल्या कोरेगाव सारख्या अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेल्या सवाई नाना फडणवीस म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचा संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी इथे राहता वाडा आहे. अडीचशे वर्षांपूर्वी  निमगावजाळी इथे त्रिंबकजी डेंगळे यांनी हा चिरेबंदी चौसोपी वाडा त्याच बरोबर संपूर्ण गाव कवेत घेणारी आखीवरेखीव गावकुस, गावातील शंभू महादेवाची मंदिरे, गावास पाणीपुरवठा करणारी चिरेबंदी बारव,आणि इतर गोरगरीब जनतेची घरेही बांधली गेली. औरसचौरस वाड्याचा मागील भाग आता सरत्या काळाच्या खाणाखुणा लेवून बराचसा मोडकळीस आलेला आहे. तरीही गट काळातील वैभवाच्या खाणाखुणा अलगद दाखवत आजही या वाड्याचा अपूर्व पसारा सर्व डोलारा सांभाळीत उभा आहे. अनेक कपाटे, सागवानी दरवाजे,खुंट्या, कमानी,जिने, गवाक्ष, चौकातील चिरेबंदी जोते,पायऱ्या,बळद आज ही अडीचशे वर्षापूर्वी चे वैभव दाखवतात. वाड्यात एक भुयार सुद्धा आहे. ते भुयार कुठं उघडते, याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत.  गावकुस मात्र बऱ्याचठिकाणी पडझड झालेली दिसते. त्रिंबकजींच्या कारभाऱ्यानी या गावकुसास उत्तरेकडे तोंड करून दिल्ली दरवाजा उभारला होता. जणू काय पुण्यातील शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची प्रतिकृतीच! ! पण त्रिंबकजी यांची पेशवे म्हणजेच धन्याच्या पायी असलेली अपूर्व अशी स्वामिनिष्ठता एवढी प्रचंड की त्यांनी तो  दिल्ली दरवाजा परत पाडून त्या ऐवजी पश्चिम दिशेला म्हणजे पुण्याकडे तोंड करून पुणे दरवाजा  उभारायला सांगितला!  दिल्ली ला मुजरा करणारी जात मराठ्यांची नाही..! माझा धनी दिल्लीत नव्हे तर पुण्यात आहे! केवढी ती स्वामिनिष्ठता!! आज ही त्या दिल्ली दरवाजाच्या जागी एक छोटा दरवाजा खिडकी दरवाजा म्हणून उभा आहे तर पश्चिम दरवाजा म्हणजे पुणे दरवाजा ही आज सुस्थितीत दोन्ही बाजूस दोन बुरुज लेवून दिमाखात उभा आहे. शंभू महादेवाची मंदिरे आज ही सुस्थितीत आहेत. त्यातील प्रकाशयोजना बघण्यासारखी आहे. चिरेबंदी बारव आज ही पाण्याने तुडुंब भरलेली आहे. असं हे इतिहासातील गतकालीन कौतुकाचे वैभव! 

आपलं भाग्य असं की हे ऐतिहासिक आणि अपूर्व असे वैभव आपल्याच परिसरात आहे!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post