जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पदभार स्वीकारला

 *सर्वांच्या सहकार्याने जिल्हा विकासासाठी प्रयत्न*


*कोरोनाचा मुकाबला आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमध्ये शेतकर्‍यांना दिलासा हेच प्राधान्य*


*नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला मनोदय**अहमदनगरमध्ये चांगले काम करु शकलो याचा मनस्वी आनंद*


*मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केल्या भावना*अहमदनगर, दि. २१- जिल्ह्यातील प्रश्न लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने जिल्हा विकासासाठी कार्यरत राहू. सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली तर गेल्या अडीच वर्षाच्या काळात अहमदनगर जिल्हयात येथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने आणि जिल्हावासियांच्या सहकार्याने चांगले काम करु शकलो, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली.आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे डॉ. भोसले यांनी श्री. द्विवेदी यांच्याकडून स्वीकारली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत आणि श्री. द्विवेदी यांना निरोप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.


 यावेळी पदग्रहण केल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आपल्या पुढील कामकाजाची दिशा स्पष्ट केली. सामान्य माणसाचे प्रश्न वेळीच सोडवण्यावर भर दिला जाईल, विशेषता तालुका आणि उपविभाग स्तरावर त्यांचे प्रश्न मार्गी लागले तर  नागरिकांना जिल्हा मुख्यालयी  धाव घ्यावी लागणार नाही. यापूर्वी जिल्ह्यात काम केलेले असल्याने येथील भौगौलिक परिस्थिती आणि प्रश्नांची जाण असल्याचे त्यांनी नमूद केले.


सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी दुसरी लाट येणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आपला जिल्हा सुरक्षित राहील, यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिले पाहिजे. कोरोनाच्या संकटासोबतच अतिवृष्टीचा फटका जिल्ह्याच्या काही भागांना बसला आहे. तेथील पंचनामे तात्काळ पूर्ण होऊन शेतकर्‍यांना या नुकसानीत दिलासा मिळेल, यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्याने काम करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

या सत्कार व निरोप समारंभावेळी अधिकारी वर्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. अपर जिल्हाधिकारी श्री. सोरमारे यांनी श्री. द्विवेदी यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रिया अतिशय शांतते्च्या वातावरणात पार पडल्याचे सांगितले. नवीन जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळातही सर्व अधिकारी-कर्मचारी  त्यांच्या नेतृत्वात  विकास प्रक्रियेत काम करतील, असा विश्वास दिला. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचीत यांनी श्री. द्विवेदी यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगितल्या. कोरोना काळात त्यांनी स्वता नेतृत्व करुन प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.


उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार ज्योती देवरे, तहसीलदार अमोल निकम यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या.                 ****  


*बुके नको बुक्स द्या!*


*नूतन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे स्वागत करण्यासाठी अधिकारी वर्गासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदी आले होते. त्यांनी येताना फुलांचे गुच्छ आणले होते. मात्र, डॉ. भोसले यांनी आता यापुढे असे गुच्छ (बुके) नकोत, तर पुस्तके (बुक्स) द्या, असे सांगितले. यातून त्यांनी पुस्तकांप्रती असणारे प्रेमच जणू प्रकट केले!* 


*अहमदनगर जिल्ह्याने दिले कामाचे समाधान*

*वाशिमसारख्या तुलनेने लहान जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी राहिल्यानंतर अहमदनगर सारख्या विस्तारलेल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारीपदी काम करता आले. जिल्ह्यात या काळात विविध आव्हानांना सामोरे जावे लागले तरी जिल्हावासियांसाठी काम करताना या कामातून आनंद आणि समाधान मिळाले. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे काम करु शकलो, अशी भावना निरोप समारंभावेळी श्री. द्विवेदी यांनी व्यक्त केली.*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post