‘उमेद’ अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

 ‘उमेद’ अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

शासनाने पुनर्नियुक्ती द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलननगर : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीने काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना कमी न करण्याची तसेच सर्व मनुष्यबळ बाह्य संस्थेस वर्ग न करण्याची मागणी या अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी केली आहे. राज्यभरात सुमारे 3 हजार कंत्राटी कर्मचारी या अभियानांतर्गत कार्यरत असून एमएसआरएलएम-उमेद मध्ये काम करणार्‍यांना बेरोजगार करू नये अशी मागणी करीत संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

यावेळी अध्यक्ष आजिनाथ आव्हाड, सचिव प्रमोद पांडे, बाबासाहेब सरोदे, प्रशांत शिंदे, राहुल साळवे, फिरोद सय्यद, मंजुषा धिवर, कविता बार्वे, सुजाता झरेकर, सविता प्रजापती, वर्षा बाचकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संपूर्ण देशभर उमेद अभियान सुरु आहे. या अभियानात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्याचे धोरण राबवून सदर उमेद अभियान भांडवलदार संस्थेच्या दावणीला बांधणे, अन्यायकारक आहे. या अन्यायाविरुध्द संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदचे सर्व कर्मचारी आंदोलन करीत असून शासनाने भूमिकेचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आरोग्य, शिक्षण व रोजगार या क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्याकरिता जागतिक बँकेच्या सहकार्याने उमेद अभियान ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. अनेक वर्षांपासून उमेद कर्मचारी व ग्रामीण महिलांचे ऋणानुबंध जुळले आहेत. हे ऋणानुबंध तोडून उमेद अभियानाचे संपूर्ण खासगीकरण करण्यास कर्मचार्‍यांचा तीव्र विरोध आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अभियानाची सुरुवात 2012-13 मध्ये झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 11 हजार 761 स्वंयसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून त्यात 1 लाख 22 हजार कुटुंबे समाविष्ट आहेत.  या कुटुंबांना अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी उपजिविकेच्या उपक्रमांसाठी प्राप्त झालेला असून दारिद्रय निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे. सध्या जिल्हा, तालुका व प्रभाग पातळीवर 100 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी उमेद अभियानाची अंमलबजावणी करीत आहेत. आता या सर्वांनाच पुनर्नियुक्ती आदेश न मिळाल्याने कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post