विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची निदर्शने

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची निदर्शने


अहमदनगर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून वर्षानुवर्षे शिक्षकांना उपाशीपोटी अध्यापन कार्य करावे लागत आहे. या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्यक्रमाने करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. राज्य शासनाने फेब्रुवारी 2018 मध्ये लिखित स्वरुपात शिक्षकांच्या मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना काळा दिवस पाळणार असून यादिवशी काळ्या फिती लावून कामकाज केले जाणार असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ टकले, सेके्रटरी मच्छिंद्र दिघे, रवींद्र देवढे, राजू रिक्कल, किसनराव दिघे, संतोष ढोबळे, भाऊसाहेब गव्हाणे, सुनिल गोरे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे, केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांनाही वेतन अनुदान द्यावे, दशकाहून अधिक काळ वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे, आयटी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे, करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आय.टी.शिक्षक संबंधित शाळा, महाविद्यालयात मोलची भूमिका बजावत आहेत.
 बोर्डाच्या परीक्षेत ऑनलाईनची कामेही हेच शिक्षक करीत आहेत. त्यामुळे त्यांना वेतन श्रेणीत वेतन अनुदान द्यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचार्‍यांना 10,20,30 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post