नगर शहर शिवसेनेतील गटबाजी कायम, मंत्री गडाखांसमोरच दोन्ही गटांकडून आरोपप्रत्यारोप

नगर शहर शिवसेनेतील गटबाजी कायम, मंत्री गडाखांसमोरच दोन्ही गटांकडून आरोपप्रत्यारोप

नगर : शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात शिवसेनेच्या नेतृत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीपासून सेनेत दोन गट पडले असून राठोड यांच्यानंतर या दोन्ही गटात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी आज सोनईत नगरमधील पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत समेटाऐवजी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप झाल्याने सेनेतील गटबाजी तूर्तास तरी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा असलेल्या माजी आ.अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेने जिल्ह्यात शिवसेनेला ताकद देण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हाती शिवबंधन बांधले. जिल्ह्यात शिवसेनेची सर्वात जास्त ताकद नगर शहरात आहे. परंतु, याचठिकाणी राठोड यांच्यानंतर नेतृत्त्वाचा तिढा वाढला आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित काम न केल्याने स्वत: राठोड पक्षाच्याच काही नगरसेवकांवर नाराज होते. तेव्हापासूनच शहरात दोन गट अस्तित्वात आले होते. राठोड यांच्या निधनानंतर राठोड समर्थकांनी आपला वेगळा गट कायम ठेवला असून दुसर्‍या गटाबरोबर जाहीर कार्यक्रम, आंदोलने टाळली जात आहेत. यापार्श्वभूमीवर मंत्री गडाख यांनी पुढाकार घेवून शहरातील पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीत मनोमिलनाऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. नगरसेवक निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत कोणी काय केले, कोण राष्ट्रवादीच्या तालावर चालतो या मुद्दयांवरच भर देण्यात आला. आगामी महापौर पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाली. परंतु, संभाव्य उमेदवाराच्या अपात्रतेसाठी स्वपक्षातूनच प्रयत्न होत असल्याचा आक्षेप काही पदाधिकार्‍यांनी घेतला. काहींनी संपर्कप्रमुख कोरगांवकर यांच्या कार्यशैलीवरही बोट ठेवत राज्यात सत्ता असूनही स्थानिक पातळीवर त्याचा फायदा मिळत नसल्याचे मंत्री गडाख यांच्या निदर्शनास आणून दिले.
एकूणच गडाखांचा शहर शिवसेनेत मनोमिलन घडविण्याचा पहिला प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. गडाख यांनी संपर्कप्रमुखांना नगर शहराची पुन्हा स्वतंत्र बैठक घेवून सर्वांशी वन टू वन चर्चा करून वाद शमविण्याची सूचना केल्याच सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post