नगर मनपात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? स्थायी समिती सभापती निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

 


नगर मनपात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? स्थायी समिती सभापती निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

भाजप व राष्ट्रवादीतील समझोता कायम राहणार की नवीन राजकीय समीकरणे ?नगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतपदी पदासाठी 25 सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5, शिवसेना 5, भाजप 4, कॉंग्रेस 1 व बसप 1 असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. विशेषत: राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी असताना नगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सत्तेत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे शिवसेना व राष्ट्रवादी राज्यस्तरावर एकत्र आले आहेत. आता राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नगर महानगरपालिकेतही यशस्वी होणार का? याची चर्चा रंगली आहे. नगर मनपात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्थायी समिती आघाडीच्या ताब्यात येवू शकते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होईल, असे सांगितले आहेत. परंतु, स्थानिक पातळीवर आ.संग्राम जगताप यांच्या भूमिकेवरच महानगरपालिकेतील नवी समीकरणे अवलंबवून राहणार आहेत. भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी मनोज कोतकर यांचे नाव चर्चेत आहे. अर्थात यासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळणे आवश्यक आहे. नगरमधील या निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीचे स्थानिक पातळीवरील मनोमिलनही चर्चेत आलेले आहे. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीने भाजपची साथ दिल्यास राज्यात वेगळा संदेश जावू शकतो. त्यामुळे आघाडीतील सर्वच पक्षांसाठी नगरमध्ये रणनिती ठरवणे महत्त्वपूर्ण असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post