मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनोज कोतकर ‘बिनविरोध’,

मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनोज कोतकर ‘बिनविरोध’, 

शिवसेनेची राष्ट्रवादीसाठी निवडणूक रिंगणातून माघार, भाजपचे सूचक मौननगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवक कोतकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना पक्षाकडून सभापतीपदाची उमेदवारीही दिली. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. सेनेकडून नगरसेवक योगीराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र शुक्रवारी वरिष्ठ पातळीवरुन महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश आल्याने गाडे यांनी माघार घेतली. राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी या निवडीनंतर सभापती कोतकर यांचा सत्कार केला. यावेळी आ.संग्राम जगताप, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

नगर महानगरपालिकेत भाजप राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. परंतु, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असल्याने नगरमध्ये महाविकास आघाडी एकसंघ दाखवणे आवश्यक होते. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने मोठी चाल खेळत एकाचवेळी शिवसेना व भाजपलाही चितपट केले. भाजपकडूनही कोतकर यांनाच सभापतीपदाची उमेदवारी निश्चित होती. परंतु, कोतकर भाजपकडून लढले असते तर राष्ट्रवादीची महाविकास आघाडीमुळे अडचण झाली असती. यातून मार्ग काढत राष्ट्रवादीने कोतकर यांना स्वपक्षात घेवून मोठी खेळी केली. एका तीरातून भाजप व शिवसेनेलाही त्यांनी चितपट केले. यात पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या असून कोतकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपकडून बाळगले गेलेले मौन सूचक मानले जात आहे. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेलाही आपल्यामागे येण्यास भाग पाडले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post