अनिल भैय्या राठोड हे सर्वसामान्यांचे होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे

                                           माजी मंत्री अनिल राठोड यांना  सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली

                                           भैय्यांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित गहिवरलेनगर: शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना आज नगरमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नक्षत्र लॉन येथे झालेल्या या शोकसभेस  राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, विक्रम राठोड,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, माजी महापौर भगवान फुलसोंदर, संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भाजपचे भैय्या गंधे, ॲड.अभय आगरकर, कॉंग्रेसचे किरण काळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर सुजाता कदम, योगीराज गाडे, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाबुशेठ टायरवाले,  वसंत लोढा,  सचिन डफळ, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, डॉ.बाळ बोठे, संदेश कार्ले, दीप चव्हाण, शरद झोडगे, दत्ता जाधव, श्रीराम येंडें , डॉ.बापु कांडेकर, डॉ.सर्जेराव निमसे, किरण व्होरा  आदी उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,  खासदार प्रताप जाधव, खा.गिरीश बापट, भाजप नेते एकनाथ खडसे, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भैय्यांना ऑनलाईन व्हिडीओद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. पू.आदर्शॠषीजी महाराज, हभप भास्करगिरी महाराज यांनी पाठवलेले शोकसंदेश यावेळी वाचण्यात आले.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, अनिल भैय्या राठोड हे सर्वसामान्यांचे नेते होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे. त्यांनी केलेल्या अजोड कार्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी कोणाची भीड बाळगली नाही. चोवीस तास ते फाटक्यातुटक्या लोकांसाठी उपलब्ध असायचे. गोरगरिबांची चूल पेटवण्याचे काम त्यांनी केले. खरे तर यावेळी तेच मंत्री होणार होते, पण मला शिवसेनेने संधी दिली. मी मंत्री झाल्यावर त्यांना भेटायला आलो व त्यांनी खुल्या दिलाने माझे स्वागत केले.

माजी आमदार विजय औटी म्हणाले की, भैय्या रूग्णालयात दाखल झाले तेव्हा वाटले नव्हते ते असे जातील. नगर शहर, शिवसेना व भैय्या हे वेगळे नाते होत. विधानसभेत त्यांच्या बरोबर काम केले. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर अनेक घडामोडी घडल्या. पण आम्ही सेनेबरोबरच राहिलो. भैय्या सर्वसामान्यांचे नेते होते.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, अनिल भैय्या यांनी जनसामान्यांसाठी ३५ वर्षे अविरत संघर्ष केला. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवली. पक्ष निष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिले. अनिल राठोड यांचा जनसेवेचा राजकीय वारसा विक्रम राठोड पुढे चालवतील, असा विश्वास वाटतो.

भाऊ कोरगांवकर म्हणाले की,माझी व भैय्यांची ओळख १९९५ पासून होती. त्यांनी अविरत जनता जनार्दनाची सेवा केली. शिवसैनिकांनी अनिल भैय्यांचा चरित्रग्रंथ तयार करावा. त्यांचा प्रेमळ हात कायम आपल्या पाठीशी असेल.भैय्या गंधे म्हणाले की, अनिल राठोड यांनी सलग. २५ वर्षे शहराचे नेतृत्व केले. असा नेता पुन्हा होणार नाही. त्यांना भाजपच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post