आव्हानात्मक परिस्थितीत प्रवरा बँकेने 1 हजार कोटींच्या व्यवसायाची कामगिरी केली : आ.राधाकृष्ण विखे पा.
प्रवरा सहकारी बॅंकेच्या कोल्हार येथील शाखेचे उद्घाटन
राष्ट्रीयकृत आणि सहकारी बॅकांच्या समोर अर्थिक परिस्थितीचे आव्हान मोठे आहे. अशाही कार्यकाळात प्रवरा सहकारी बॅकेने १ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे पूर्ण केलेले उद्दीष्ट ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
प्रवरा सहकारी बॅंकेच्या कोल्हार येथील शाखेचे उद्घाटन आ.विखे पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ.भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आ.विखे पाटील यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानातून प्रत्येक घटकांसाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या योजनेचा लाभ प्रत्येक क्षेत्रातील घटकांना होत असल्याचे आवर्जून नमूद केले.
आ.विखे पाटील म्हणाले की,प्रवरा सहकारी बॅकेची वाटचाल ही सामान्य ठेवीदार कर्जदार यांच्या विश्वासावर झाली.सोसायटीच्या कार्यालयातून अवघ्या सहा हजार रूपयांच्या ठेवीवर सुरू झालेल्या या बॅकेने ६२५ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा गाठला. शेतक-यांपासून ते पथविक्रेत्या पर्यत विविध योजनातून अर्थसहाय्य केल्याने समाजातील छोटा घटक आत्मविश्वासाने उभा राहील्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
नैसर्गिक आपत्ती,करोना संकटाने सर्व व्यवसाय बंद आहे. समाजाची घडी विस्कटली आहेच या पार्श्वभूमीवर दिलेल्या कर्जाची वसुली करण्याचे मोठे आव्हान सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅका समोर आहे. केंद्र सरकारने तीन महीन्याच्या सवलतीची मुदतही संपली आहे. दिलेल्या कर्जाचे व्याज माफ होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून याबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचेच लक्ष असले तरी, कर्जाचे व्याज माफ करताना बॅकानाही होणा-या अर्थिक तोट्याचा विचार करून केद्र सरकार दिलासादायक निर्णयाचा मार्ग काढेल असा दिलासा त्यांनी बोलताना दिला.
आधी दुष्काळाने आणि नंतर करोनामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाली.यापूर्वीच राज्य सरकारने मदत जाहीर करायला हवी होती पण सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. जिल्ह्य़ातील तीनही मंत्री शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देतात आणि काँग्रेस विरोध दाखविते महाविकास आघाडी सरकारचा कृषि धोरणाच्या विरोधातील आरडाओरडा हा फक्त दिखावूपणा असल्याची टिका त्यांनी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पाटील, व्हा चेअरमन अशोक आसावा यांची याप्रसंगी भाषण झाली. कार्यक्रमास सभापती सौ.नंदाताई तांबे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदुशेठ राठी, डॉ विखे कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, दिनेश बर्डे, भरत अंत्रे, बॅकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ बालोटे आदी उपस्थित होते. शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या मोफत अपघात विमा योजने अंतर्गत ३ कुटुंबियांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
Post a Comment