आ.संग्राम जगताप यांच्या ‘त्या’ दाव्याने भाजपमध्ये ‘संशयकल्लोळ’

आ.संग्राम जगताप यांच्या ‘त्या’ दाव्याने भाजपमध्ये ‘संशयकल्लोळ’

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची मोठी किंमत भाजपला चुकती करावी लागणार?नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी भाजपला दे धक्का देत त्यांच्या पक्षातून मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत सभापतीपद दिले. या घडामोडीनंतर आगामी महापौरपदाच्या निवडीच्या दृष्टीनेही नगरमध्ये राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाने संख्याबळ नसताना नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौरपद तसेच उपमहापौरपद मिळवले. शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी त्यावेळी युती असतानाही भाजपने राष्ट्रवादीची साथ मिळवली. मात्र आता या भाजपला त्या राजकीय तडजोडीची किंमत मोजावी लागणार असल्याचे चित्र आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडूनही मनोज कोतकर यांचेच नाव चर्चेत होते. परंतु, राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता लक्षात घेवून शिवसेनेने राष्ट्रवादीला साथ दिली. त्यासाठी राष्ट्रवादीने कोतकर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला.

मात्र राष्ट्रवादीची ही राजकीय खेळी इथेच थांबणार नसल्याचे आ.जगताप यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. भाजपचे आणखी काही नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ बांधताना दिसतील असा दावा आ.जगताप यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये नगरसेवकांबाबत संशयाचे वातावरण तयार झाले असून नेमके कोण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, याची चर्चा रंगली आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवरुन मोठे राजकारण घडत असताना तसेच नगरसेवक बाहेर पडला असताना भाजपच्या नेत्यांकडून मौन बाळगण्यात आले आहे. महापौर तसेच अन्य पदाधिकार्‍यांचे हे मौन कोड्यात टाकणारे असून सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यामध्येही पक्षाच्या रणनितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post