हायग्रेड परफ्युम, सौंदर्य प्रसाधनासाठी उपयुक्त जिरेनियम वनस्पतीची शेती व तेल निर्मिती

हायग्रेड परफ्युम, सौंदर्य प्रसाधनासाठी उपयुक्त जिरेनियम वनस्पतीची शेती व तेल निर्मिती
देहरे येथील युवा शेतकरी विक्रम काळे यांचे जिरेनियम शेतीतून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान


अहमदनगर : शेती व्यवसाय शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्याने आतबट्टयाचा ठरतो, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र थोडी कल्पकता व बाजारपेठेचा अभ्यास केल्यास शेतीत वेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळणे शक्य असते. नगर तालुक्यातील देहरे येथील वैभव विक्रम काळे या युवकाने असाच अभ्यास करून जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची शेती करीत त्यापासून तेल निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे. जिरेनियम वनस्पतीचे तेल सुगंधी परफ्युम, ऍरोमा थेरपी, सौंदर्य प्रसाधनांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. जिरेनियमला असलेला मूळचा सुगंध तेलातही उतरतो. त्यामुळे त्याला सौंदर्यप्रसाधने निर्मितीत मोठी मागणी असते. जवळपास 12 ते 13 हजार रुपये लिटर या दराने विकले जाणारे हे तेल मोठ्या कंपन्या थेट शेतकर्‍याच्या दारात येवून खरेदी करतात. भारतात या तेलाची वर्षाला सुमारे 200 टन मागणी असते. त्यापैकी भारतात याचे उत्पादन केवळ 5 ते 6 टन होते. बाकी सर्व माल आयात केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नात अशा पध्दतीने जिरेनियमपासून तेलाची निर्मिती करून शेतकरी निश्चितच योगदान देवू शकतात. पारंपरिक पिकांतून न मिळणारी शाश्वतता या जिरेनियमन शेतीतून नक्कीच प्राप्त केली जावू शकते.
नगर तालुक्यातील देहरे गावातील शेतकरी कुटुंबातील वैभव काळे यांनी बीएस्सी ऍग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर पारंपरिक शेतीत निरनिराळे प्रयोग करण्याचे ठरवले. यातूनच त्यांना जिरेनियम शेतीची माहिती मिळाली. त्यांनी सातारा तसेच अन्य भागात जावून प्रत्यक्ष जिरेनियम शेती कशी केली जाते याची माहिती घेतली. केंद्र सरकारने सीमॅप अरोमा मिशन अंतर्गत लखनौ येथे जिरेनियम शेती व तेल उत्पादन याचे रितसर प्रशिक्षण घेतले. सुमारे दीड वर्षांपूर्वी आपल्या चार एकर शेतीत त्यांनी जिरेनियमची लागवड केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या शेतातच जिरेनियमपासून तेल उत्पादन करणारा प्लान्टही बसवला. यातून त्यांनी तेलाची निर्मिती सुरु केली. चार एकरातून त्यांनी जवळपास 4 ते साडेचार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. सुरुवातीला जिरेनियमचे टिश्यू कल्चरचे रोपे तयार करणे, लागवड करणे यासाठी त्यांना 70 ते 80 हजार रुपये खर्च आला. तेल निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे दीड लाखांचा खर्च आला. जिरेनियमचे वैशिष्ट्‌ये म्हणजे एकदा लागवड केल्यावर चार महिन्यांनी पिकाची कापणी करावी लागते. कापणीनंतर नव्याने लागवड करायची गरज नसते. तेच पीक जवळपास 3 वर्ष चालते. पहिल्या वर्षी त्यांनी 30 ते 35 लिटर तेलाचे उत्पादन घेतले. मुंबईतील कंपन्यांनी त्याची जागेवर येवून खरेदी केली. जिरेनियमवर प्रक्रिया केल्यानंतर उरलेला चोथ्यापासून ते कंपोस्ट खताची निर्मिती करतात. हे खतही जिरेनियमच्या शेतीतच वापरण्यात येते. जिरेनियमचे आणखी वैशिष्ट्‌य म्हणजे या पिकाला एखादी औषध फवारणी पुरेशी ठरते. याशिवाय या पिकापासून जनावरेही दूर राहतात. त्यामुळे रानडुकरे, हरिण अशा जनावरांपासून पीकाची नासाडी होण्याची भितीही नसते.
नगर तालुक्यात जिरेनियम शेतीचा हा पहिलाच प्रयोग असून विक्रम काळे यांनी तो यशस्वीपणे राबविला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तसेच इतरवेळीही शेतीत काबाडकष्ट करून पिकवलेल्या पारंपरिक पिकांना भाव मिळेल की नाही याची चिंता शेतकर्‍याला असते. परंतु, जिरेनियम तेलाला बाजारात असलेली मागणी पाहता या शेतीतून हमखास उत्पन्नाची खात्री आहे. त्यातही भारतातील उद्योगात या तेलाची मागणी पाहता हजारो लाखो एकर शेती जरी जिरेनियम लागवडीखाली आली तरी त्याचा फायदाच होणार आहे. विक्रम काळे याने दाखवलेली ही कल्पकता पंचक्रोशीतील शेतकर्‍यांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. शेती परवडत नाही अशी ओरड करण्यापेक्षा बाजारपेठेची गरज ओळखून शेतीत बदल केले तर शेतीतूनही शाश्वत उत्पन्न मिळू शकते हेच काळे यांनी दाखवून दिले आहे. आपल्या या वेगळ्या शेतीचा इतरांनाही फायदा करून देण्याचा काळे यांचा मानस असून शेतकर्‍यांनी आवर्जून आपल्या प्लान्टला भेट देवून माहिती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कमी उत्पादन खर्चात अधिक नफा
शेतीत उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारी किंमत याचा ताळमेळ बसत नाही. जिरेनियम लागवड केल्यावर तीन वर्षे नव्याने लागवड करण्याची गरज नसते. कापणी केल्यानंतर परत जिरेनियम वनस्पती आपोआप उगवते. फवारणीही कापणीनंतर एकदाच करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्ष मिळणारी किंमत अधिक ठरते. वनस्पतीपासून तेल काढण्याची प्रक्रियाही तुलनेने सोपी व छोट्या जागेतही सहज करता येण्यासारखी आहे. त्यामुळे जिरेनियमपासून तेलनिर्मिती करणे फायद्याचे ठरते.
mo-9860802064

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post