पाचवीही मुलगीच झाल्याने बाप झाला परागंदा, पत्नी व पाच मुलींना अक्षरश: वार्‍यावर सोडले

पाचवीही मुलगीच झाल्याने बाप झाला परागंदा, पत्नी व पाच मुलींना अक्षरश: वार्‍यावर सोडले

नगर : मुलगा झाल्याशिवाय संसार पूर्ण होत नाही अशी समाजाची मानसिकता महिलांसाठी शतकानुशतके त्रासदायक ठरत आहे. यातूनच मुलगी झाली म्हणून महिलेचा छळ होत असल्याच्या घटना समाजात कायम घडत असतात. नगर तालुक्यातील कामरगाव येथे तर पाचव्यावेळीही मुलगी झाल्याने एका पतीने चक्क पत्नी व मुलींना वार्‍यावर सोडून पलायन केले. गावातील हमरस्त्यावर तंबू ठोकून कसाबसा संसार करणार्‍या या अभागी मातेच्या पदरी आता पाच मुलींचा सांभाळ करण्याचा प्रश्न आहे.
रोजरोटीसाठी कामरगाव परिसरात स्थायिक झालेले संतोष साळुंके याचा वंशाला दिवा मिळावा यासाठी प्रचंड आटापिटा चालू होता. चार मुली झाल्यानंतरही मुलाचा हव्यास काही सुटेना. यातूनच त्याची पत्नी पाचव्यांदा गरोदर राहिली व तिला परत मुलगी झाली. यासाठी पत्नीलाच दोषी ठरवत साळुंके याने पत्नी व पाचही मुलींची जबाबदारी नाकारली व तो पळून गेला. बाळंत असल्याने बाहेर कामासाठी जाता येईना, खायला चिमुकली पाच तोंड...अशा अवस्थेत दिनवानी बसलेल्या या महिलेच्या मदतीला कामरगावमधीलच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे धावून गेले. विनोद कातोरे, माजी सरपंच वसंत ठोकळ यांच्या सहकार्यातून कातोरे यांनी या महिलेला धान्य, किराणा माल, कपडे अशी मदत केली. मात्र ही मदत झाली असली तरी महिला व तिच्या पाच मुलींसमोर भविष्याचा प्रश्न कायम आहे. परागंदा झालेला पती कसा शोधायचा व उर्वरित आयुष्य कसे व्यथित करायचे असा सर्वांनाच निरुत्तरीत करणारा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा आहे.
सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबवित आहे. यातून व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही बुरसटलेली मानसिकता कमी होण्याचे नाव घेत नाही, याचेच प्रत्यंतर कामरगावमधील या महिलेच्या व्यथेतून समोर आलय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post