तुम्ही जात असलेल्या भागात करोनाची परिस्थिती काय आहे?
गुगल मॅपचे नवीन फिचर
नवी दिल्ली : रस्त्याने प्रवास करताना योग्य दिशा दर्शवणारे गुगल मॅप आता करोनाकाळात करोना हॉटस्पॉटबाबतही मार्गदर्शन करणार आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना आपण जात असलेल्या भागात करोना रूग्ण किती आहेत, कोणत्या परिसरात करोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे हे एका क्लिकवर कळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर क्वारंटाईन, हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोन असे नवे शब्द मोठ्या प्रमाणावर रोज कानावर पडत आहेत. करोनाची परिस्थिती भितीदायक असली तरी कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडणेही क्रमप्राप्त आहे. अशावेळी किमान आपण जात असलेल्या परिसरात करोनाची स्थिती काय आहे हे कळले तर अधिक काळजी घेता येवू शकते. त्याचदृष्टीने कोरोना हॉटस्पॉटची माहिती गूगल मॅपवर मिळणार आहे.
गुगल मॅप ऍपच्या वरच्या बाजूला असलेल्या कोविड 19 या पर्यायावर क्लिक केल्यावर एक लाख लोकसंख्येमागे किती रुग्ण विशिष्ट भागात आहेत, याची माहिती मिळेल. यासह विशिष्ट भागात किती रुग्ण वाढले किती कमी झाले ही माहितीही मिळेल, असं प्रॉडक्ट मॅनेजर सुजॉय बॅनर्जी यांनी सांगितलं.
Post a Comment