करोनाकाळात अविरत काम करणार्‍या ग्रामसेवकांना 15 दिवसांची सुटी मिळावी - एकनाथ ढाकणे

करोनाकाळात अविरत काम करणार्‍या ग्रामसेवकांना 15 दिवसांची सुटी मिळावी - एकनाथ ढाकणे
राज्याप्रमाणे केंद्रानेही ग्रामसेवकांना 50 लाखांचे विमा कवच द्यावे 
राज्य ग्रामसेवक युनियनची ऑनलाईन त्रैमासिक सभा

अहमदनगर (सचिन कलमदाणे):
: ग्रामीण भागात करोनाचा प्रसार रोखतानाच व्यापक जनजागृती करण्यासाठी ग्रामसेवक अविरत काम करीत आहेत. या कालावधीत अनेकांना करोनाची लागण झाली आहे तर 7 ग्रामसेवक करोनामुळे मयत झाले आहेत. मार्चपासून अक्षरश: चोवीस तास कर्तव्य बजावणारे ग्रामसेवक आता थकले असून त्यांना किमान 15 दिवसांची सुटी देण्यात यावी तसेच ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने आश्वासने न देता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी पुढील काळात व्यापक आंदोलन उभारुन संघर्ष करण्याचा एकमुखी निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केला आहे. ग्रामसेवकांना राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. यात केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी उचलून केंद्राकडूनही 50 लाखांचे विमा कवच उभारावे असा ठराव युनियनच्या त्रैमासिक सभेत करण्यात आल्याची माहिती, युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची त्रैमासिक सभा झूम ऍपव्दारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या मिटिंगमध्ये राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे नगरमधून सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजीव निकम, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, बुलढाणा येथील चव्हाण, जालना येथील समाधान वाघ, शेळके, अशोक काळे, राजेंद्र पावसे, अशोक नरसाळे, सुनिल नागरे, मंगेश पुंड, बाळासाहेब आमरे आदी उपस्थित होते. राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हा युनियनचे जिल्हाध्यक्ष, सचिव यांनी या ऑनलाईन मिटिंगमध्ये सहभाग नोंदवला.
बैठकीत ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तसेच कोविड काळात कर्तव्य बजावताना येणार्‍या अडीअडणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामसेवक युनियनने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ग्रामसेवकांना कोविड काळात 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. राज्यात 7 ग्रामसेवक कर्तव्य बजावताना कोविड मुळे मयत झाले आहेत. त्यापैकी 1 जणाच्या कुटुंबियांना 50 लाखांचा विमा मिळाला आहे. उर्वरित 6 जणांची प्रकरणे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्याप्रमाणे केंद्रानेही 50 लाखांचे विमा कवच देवून ग्रामसेवकांना 1 कोटीचे विमा कवच मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. कोविड काळात ग्रामसेवकांना देण्यात येणारी अतिरिक्त कामे नाकारणे, कोकणात ग्रामसेवकांना फळबाग लागवडीची सक्ती करू नये, जिल्हा परिषदेमार्फत दुर्धर आजारात मदत देण्यात येते. या आजारांची यादी अद्ययावत करून त्यात करोनाचाही समावेश करावा, आठवड्यातील पाच दिवसांपैकी किमान 2 दोन दिवस ग्रामसेवकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी, प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामविकासमंत्री, रोहयो मंत्री, सचिवांकडे पाठपुरावा करणे आदी ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर युनियनच्या संघटनात्मक निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post