स्वीकृत नगरसेवक यादीसाठी सर्वपक्षीयांचा काथ्याकूट, ‘यांची’ नावं चर्चेत..

 स्वीकृत नगरसेवक शिफारसींसाठी सर्वपक्षीयांचा काथ्याकूट, ‘यांची’ नावं चर्चेत..नगर : नगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया होत असून स्थायी समिती सभापती पाठोपाठ स्वीकृतची निवड प्रक्रिया होत असल्याने महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. काही महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनपाची सर्वसाधारण सभा झाली होती. परंतु, एकही शिफारस निकषात बसत नसल्याचे कारण देत तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गटनेत्यांच्या शिफारसी फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी निकषात बसणारी नावे देण्याचे ठरवून तशी मोर्चेबांधणी केली आहे.

स्वीकृत सदस्य निवडीमुळे इच्छुकांच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. संख्याबळानुसार शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी 2 तर भाजपचा 1 सदस्य निवडून जाणार आहे. भाजपकडून सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले यांच्या नावाची चर्चा आहे. मागील वेळी पक्षाने एका उद्योजकाला दिलेली उमेदवारी वादग्रस्त ठरली होती व यात मोठे अर्थकारण झाल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे भाजपकडून एकमेव जागेसाठी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनेकडून मदन आढावा, संग्राम शेळके यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर सेनेतील गटबाजी आणखी वाढली असल्याने ऐनवेळी अन्य नावेही पुढे येवू शकतात. त्यातही विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील वेळी विपुल शेटिया तसेच बाबासाहेब गाडळकर यांची नावे दिली होती. मधल्या काळात गाडळकर यांचे दुर्दैवी निधन झाल्याने राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून प्रा.माणिक विधाते यांच्याही नावाची चर्चा आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post