सॅनिटायजर आपलं असेल तर दोन थेंब...आणि दुसर्‍याचे असेल तर हाताला आंघोळ

सॅनिटायजर आपलं असेल तर दोन थेंब...आणि दुसर्‍याचे असेल तर हाताला आंघोळ

करोनाच्या आगमनामुळे सॅनिटायजर, मास्क हे शब्द प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. पूर्वी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन केलं जायचं, आता कितीही जवळचा असला तरी लांबूनच नमस्कार केला जातो. मित्र मंडळींची पूर्वीसारखी जमत नाही, आता काय वेबिनार, झूम ऍपव्दारे ऑनलाईन भेटणंच जास्त होतं. त्यातही कधी कोणी एकमेकांना भेटलंच तर...आधी करोनाबाधितांच्या आकड्‌यांची चर्चा होते मग एकमेकांची ख्यालीखुशाली विचारुन करोनाबाबत मिळालेले अगाध ज्ञान एकमेकांना सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या अविर्भावात एकमेकांना आतली गोष्ट सांगत असल्याप्रमाणे करोनाची गार्ंभीय पटवून देण्यात येतं. यात आणखी एक सूर असतो तो म्हणजे आपण आपली काळजी घ्यायची...अशा गप्पा रंगत असतानाच निघायची वेळ होते. बराच वेळ एकमेकांसोबत असल्यानं मनात या सहवासातून संसर्ग होणार नाही ना? याची भिती असतेच. मग अशावेळी सहज म्हटले जाते, सॅनिटायजर काढ ना खिशातून...जरा दोन थेंब माझ्या हातावर टाक ना...त्यातही सॅनिटायजरची बाटली ज्याची असते तो मोजून दोन थेंबच टाकतो. ती दुसर्‍याच्या हातात गेल्यावर मात्र समोरचा हाताला अक्षरश: आंघोळ घालतो. वरतून तू खूप काळजी घेतो बरं का...असे सांगून समोरच्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवले जाते. समोरचा बिचारा आपलं आजच विकत घेतलेल सॅनिटायजर लगेचच संपत की काय, या चिंतेत असतो. तो आपला बाटलीतील सॅनिटायजर किती कमी झाले हेच पाहतो व पुढच्या वेळी कोणी भेटलं तर सॅनिटायजरची बाटली बाहेर काढायचीच नाही, आपण सगळे गेल्यावर एकट्यानेच ते लावायचे असं ठरवतो..
- सचिन कलमदाणे, नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post