एका क्लिकने संपूर्ण बातमी लोकांपर्यंत पोहचवणारे नगरमधील वृत्तछायाचित्रकार


एका क्लिकने संपूर्ण बातमी लोकांपर्यंत पोहचवणारे नगरमधील वृत्तछायाचित्रकार
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त विशेष लेख....
                       छाया सौजन्य- जितेंद्र अग्रवाल
                                                                      

नगर : वृत्तपत्र क्षेत्रात असे म्हटले जाते की, हजार शब्दांपेक्षा एक बोलके छायाचित्र अधिक परिणामकारक आणि लोकांच्या हृदयाला भिडणारे असते. नगरमध्ये असे बोलके छायाचित्र काढणार्‍या वृत्तछायाचित्रकारांची मोठी परंपरा आहे. आज जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त या सर्व वृत्त छायाचित्रकारांना महानगर न्यूज परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा.

कोणत्याही वृत्तपत्राचे पान छायाचित्राशिवाय हलत नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांसाठी शोधक नजरेचा छायाचित्रकार हा बातमीदाराइतकाच महत्त्वाचा असतो. एखादी घटना, प्रसंग छायाचित्रातून बोलता करण्याचे काम छायाचित्रकार करीत असतो. आपल्या छायाचित्रांनी वृत्तपत्र अधिक उठावदार करणारे अनेक वृत्त छायाचित्रकार नगर शहरात कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात कावरे, चौधरी, विनोद कथुरिया, प्रकाश भंडारे, दत्ता खोजे, गुजराथी परिवार यांनी वृत्तपत्र छायाचित्रणात योगदान दिले. सकाळचे कार्यकारी संपादक ऍड.डॉ.बाळ बोठे यांनीही वृत्तपत्र क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुरुवातीला वृत्तछायाचित्रकार म्हणून योगदान दिले. पुढे पत्रकारितेकडे वळत त्यांनी मोठा पल्ला गाठला. आज पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. वाईल्ड लाईफमध्ये प्रा.सुधाकर कुर्‍हाडे, राजेश परदेशी, मिलिंद बेंडाळे.  शिवानंद भांगरे यांनीही अनेक सुंदर छायाचित्रे काढून ती वृत्तपत्रातून वाचकांपर्यंत पोहचवली आहेत.

नंतरच्या पिढीत अनिल शहा, दत्ता इंगळे, राजू शेख, जितेंद्र अग्रवाल, देवीप्रसाद अय्यंगार, महेश कांबळे, रवींद्र देशपांडे, शिरीश कुलकर्णी, सिध्दार्थ दिक्षित, समीर मणियार, सुरेश मैड यांनी वृत्तछायाचित्रकार म्हणून ठसा उमटवणारे काम केले. यातील काही जणांनी नंतर कॅमेरा सोडून लेखणी हातात घेवून ठसा उमटवला. या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक वृत्तछायाचित्रकार शहरातील वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत आहेत. राजू खरपुडे, वाजीद शेख, साजीद शेख, धनेश कटारिया, मंदार साबळे, अमोल भांबरकर, उदय जोशी, लहू दळवी, बबलू शेख, सचिन शिंदे, विक्रम बनकर, यतीन कांबळे, विजय मते अशी अनेक नावं घेता येतील.  सध्या निसर्ग छायाचित्रणात बहिरनाथ वाकळे, हितेश ओबेरॉय, नितीन केदारी, संदीप कांबळे यांंनीही वेगळापणा दाखवला आहे.

सध्याच्या डिजीटल काळातील छायाचित्रण कलेबाबत बोलताना जितेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, काळानुरुप वृत्तपत्रांमध्ये अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञान प्रगत झाल्याने फोटोग्राफीतही आमूलाग्र बदल झाले. पूर्वी रोलचे कॅमेरे होते. आतासारखी फोटो काढल्यावर लगेच रिझल्ट पहायची सोय नव्हती. त्यामुळे छायाचित्रकारांना कायम अलर्ट मोडवर रहावे लागायचे. प्रसंग, क्षण अचूकपणे टिपण्यासाठी कॅमेर्‍यातील सर्व सेटिंग आधीच पूर्ण करण्याची हातोटी साधावी लागायची. याशिवाय ईमेल, इंटरनेट सारखी साधनं नसल्याने छायाचित्र वेळेत कार्यालयात पोहोच करण्यासाठीही धावपळ करावी लागायची. आजकाल कॅमेरा हाताळणी तुलनेने सोपी झाली आहे. फोटोसाठी फक्त क्लिक केले तरी पुरेसे होते. नंतर संगणकावर हव्या त्या पध्दतीने फोटो एडिट करता येतो. आता तर मोबाईलवरही असंख्य सॉफ्टवेअर ऍप्स तयार झाले आहेत. त्यामुळे काम सोपे झाले असले तरी वृत्तछायाचित्रकार म्हणून पत्रकाराची नजर आवश्यक असते. समोरच्या प्रसंगातून नेमके काय व्यक्त झाले पाहिजे हे फोटोग्राफरला समजले पाहिजे. त्याप्रमाणे योग्य क्लिक केले तरच फोटोची परिणामकारकता अधिक भावते. फोटोमागची बातमी कळली तर उत्तम छायाचित्र येते, हे लक्षात ठेवले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाल्यासारखे वाटत असले तरी कौशल्यातून वेगळेपण साधले पाहिजे, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

-सचिन कलमदाणे,नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post