बुर्‍हाणनगर देवी रोडवरील पुल बनला धोकादायक पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे चोरीला

बुर्‍हाणनगर देवी रोडवरील पुल बनला धोकादायक
पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे चोरीला

सात दिवसात कठडे न बसविल्यास फिनिक्स फाऊंडेशनचा आंदोलनाचा इशारा
अहमदनगर- बुर्‍हाणनगर देवी रोडवरील दमडी मस्जिद जवळ असलेल्या पुलावरील लोखंडी संरक्षक पाईपचे कठडे चोरीला गेल्याने हा पुल धोकादायक बनला आहे. तर रात्री या परिसरात पथदिवे देखील नसल्याने अपघाताची संभावना असल्याने तातडीने या पुलाचे कठडे बसविण्याची मागणी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या पुलाची पहाणी करुन, येत्या सात दिवसात पुलावरील संरक्षक कठडे न बसविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिला आहे.
  बुर्‍हाणनगर देवी रोड येथील दमडी मस्जिद जवळ एक नाला वाहत असून, त्याची उंची साधारण 8 ते 10 फुट आहे. या पुलाच्या कडेला लोखंडी पाईपचे संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. काही महिन्यांपासून एक-एक करुन पुर्णत: लोखंडी पाईपचे कठडे चोरीला गेले आहे. या रस्त्यावरुन नागरदेवळे, कापूरवाडी, बुर्‍हाणनगर, आगडगाव, मिरावली पहाड येथे जाण्यासाठी भाविकांची वर्दळ असते. रात्री या पुलाजवळ अंधार असल्याने गाडिचालकांना पुलाचा अंदाज येत नसून, मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन या पुलावर संरक्षक कठडे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post