'बुलाती है मगर जाने का नहीं....

'बुलाती है मगर जाने का नहीं...' 

या शायरीमुळे राहत इंदोरी साहेबांना अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. टिक टॉकवर ही शायरी प्रचंड व्हायरल झाली. त्यावर मिम्स बनवले गेले.
फेसबुक, ट्विटर सगळीकडे ही शायरी धुमाकूळ घालत होती. या शायरीमुळे अनेक जण राहत इंदोरींना ओळखायला लागले. उर्दू साहित्यात पी एच डी केलेल्या राहत इंदोरी साहेबांनी अनेक मुशायरे, कवी संमेलनं गाजवली. त्यांनी आपल्या शायरीतून सामान्य माणसाच्या भावनांना वाचा फोडली.
ते शायरीचं उत्तम रिसायटेशन करत असत. त्यांचे भारतभर आणि जगात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. ते उर्दू भाषेचे महत्वाचे अभ्यासक आणि शायर होते. उर्दू साहित्य वर्तुळात त्यांचं मोठं नाव आहे. त्यांनी हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत हे मात्र फार कमी लोकांना माहीत असेल.

नव्वदच्या दशकात रिलीज झालेल्या गोविंदाच्या खुद्दार सिनेमातील 'तुम सा कोई, प्यारा कोई, मासुम नहीं है...' हे तद्दन फिल्मी गाणं राहत इंदोरी साहेबांनी लिहिलंय यावर कुणाचा विश्वास बसेल का ? राजकुमार संतोषीच्या घातक सिनेमातील 'कोई जाए तो ले आए, मेरी लाख दुआएँ पाए...' हे स्फोटक गाणंही त्यांनीच लिहिलंय. इष्क सिनेमातील 'नींद चुराई मेरी... किसने ओ सनम ?... तूने..' आणि 'देखो देखो जानम हम दिल अपना तेरे लिए लाए...' ही टाईमपास करणारी गाणी त्यांनीच लिहिली आहेत. विधु विनोद चोप्राच्या करिब सिनेमातील
'चोरी चोरी जब नजरें मिली...' आणि 'चुरा लो ना दिल मेरा... सनम !' ही गोड गाणी त्यांचीच. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर रिलीज झालेल्या चोप्राच्याच मिशन कश्मीर सिनेमात होरपळून निघणाऱ्या काश्मीरचं चित्र उभं करणारं 'धुआँ धुआँ...' हे अर्थपूर्ण गाणं असो किंवा काश्मीरच्या लोकगीताचा बाज असलेलं 'बुम्बरो बुम्बरो...' हे शैलीदार गाणं ! राहत इंदोरी साहेबांनी या अलबममध्ये कमाल केली आहे. बुम्बरो बुम्बरो हे नव्वदच्या दशकातील मुलांचं शाळेतील एन्युअल डे सॉंग होतं. या गाण्यातील 'चंदा की पालकी में दिल की मुराद लाई, जन्नत का नूर लेके मेहंदी की रात आई...' हे शब्द अजूनही बऱ्याच जणांच्या जिभेवर रेंगाळत असतात.

2003 साली रिलीज झालेल्या अनुराग बसूच्या मर्डर सिनेमातील 'दिल को हजार बार रोका रोका रोका...' हे
बेला चाओच्या शैलीतलं व बाबूजी धीरे चलना सारखी अरेंजमेंट असलेलं गाणं राहत इंदोरी साहेबांनी लिहिलं आहे. मुन्नाभाई एम बी बी एस मधील बंबईया शैलीतील 'एम बोले तो...' हे टुकार वाटणारं पण त्याच वेळी क्रिएटिव्ह असलेलं गाणं त्यांनीच लिहिलंय हे कळलं तेव्हा मी उडालो होतो.
'देख ले...आँखों में आँखे डाल देख ले...' हे  रंगेल पण कथानकात जिमी शेरगिलच्या पात्राचं मॉरल बुस्ट करण्यासाठी वापरलेलं गाणं कमाल आहे. 'छन छन...' हे त्यांनी लिहिलेलं मुन्नाभाई सिनेमातील माझं आवडतं गाणं आहे. नुकतीच प्रेमाची चाहूल लागलेल्या मनाच्या हळव्या भावना या गाण्यात शब्दांद्वारे अलगद उतरल्या आहेत. श्रेया घोषाल आणि विनोद राठोडचा आवाज गाण्याला अजून उंची प्राप्त करून देतो. ग्रेसी सिंगचा स्क्रीनवरचा वावर ग्रेसफुल आणि रोमांचक आहे. या गाण्याचं चित्रणही सुंदर झालंय.

मीनाक्षी - अ टेल ऑफ थ्री सिटीज हा सिनेमा फारसा चालला नाही. तो कधी रिलीज झाला होता हे पटकन कुणाला आठवणारही नाही. पण या सिनेमाचा अलबम काहीच्या काही सुंदर आहे. या अलबमनं दर्दी लोक्स आणि रहमानच्या फॅन्सच्या मनावर गारुड केलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है...' हे गाणं माहीत नसलेला रहमानचा फॅन विरळाच. गोड ट्यून, त्यावर चढवलेला सुंदर संगीतसाज, पाण्याचे बुडबुडे वाटणाऱ्या संगीतातून बाहेर पडणाऱ्या ढोलकच्या ठसकेबाज बीट्स, रीना भारद्वाजचा आवाज आणि स्क्रीनवर तब्बूसोबत एम एफ हुसेनच्या रंगांची उधळण... अफाट आहे हे गाणं...
या गाण्यातील मधाळ शब्द कुणी लिहिले असावेत ? ते ही लिहिले आहेत राहत इंदोरी साहेबांनीच ! याच सिनेमातील
'दो कदम और सही...' हे अजून एक अफाट गाणं आहे.
या गाण्यातील शब्दांसाठी राहत इंदोरी साहेबांना सलाम !
सोनू निगमचा गोड आवाज आणि रहमानी संगीत या शब्दांना अलौकिक सौंदर्य प्राप्त करून देतं. राजस्थानी लोकसंगीत आणि कलेचा आविष्कार करणाऱ्या 'रंग है...' या गाण्यात एम एफ हुसेन, ए आर रहमान आणि राहत इंदोरी साहेबांनी 'रंग' या शब्दासोबत रंगपंचमी खेळली आहे.

बेगमजान सिनेमातील 'मुर्शिदा' हे राहत इंदोरी साहेबांचं सिनेमातील शेवटचं गाणं. अरिजित सिंगने ते गायलं आहे. शायर म्हणून राहत इंदोरी साहेब मोठे होते. त्यांचा उर्दूचा अभ्यास अफाट होता हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी सिनेमासाठीही गाणी लिहिली आहेत हे बहुधा बऱ्याच जणांना माहीत नसावं !

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post