करोना प्रतिबंध उपाययोजनांचा पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार करा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रशासनाला सूचना
अहमदनगर, दि. १४ - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या काळात भर द्यावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले असून ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड सेंटर मध्ये उपचार घ्यावेत, जेणेकरुन आवश्यक रुग्णांना कोविड ह़ॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील,असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढील शंभर दिवसांसाठी नियोजन करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी परिपूर्ण आराखड़ा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि महसूलमंत्री श्री. थोरात यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतला. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे कोरोना उपाययोजनांसंदर्भातील जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आपल्या जिल्ह्यात आपण चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे बाधित संख्या वाढते आहे. मात्र, बाधित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहिम अधिक गतीमान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या यापुढील काळात वाढवावी, अनेक रुग्णांच्या बेडस मिळत नसल्याबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे जाणवणार्या आणि ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असणार्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील.
तालुकास्तरावरील वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यावर, या वैद्यकीय यंत्रणांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment